न्यायालयीन सूत्रानुसार, येथील बाजारवाडी परिसरात राहणाऱ्या मंगेशचे शेफाली सुरेश खोब्रागडे हिच्याशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्यांनी ५ जानेवारी २०१६ रोजी मार्कंडा देवस्थान येथे लग्न केले. आपल्या प्रेमाचा विजय झाल्याच्या आनंदात शेफाली संसाराचे स्वप्न रंगवत असतानाच तिचा भ्रमनिरास झाला. पतीसह सासू वनमाला कन्नाके, भासरे गणेश कन्नाके, नणंद पल्लवी बारापात्रे, तिचे पती विजय बारापात्रे आदींनी मिळून शेफालीला ५ ते ६ लाख रुपये हुंडा आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला. त्यात मारहाण आणि मानसिक त्रास दिला जात होता. त्यामुळे २८ मे २०१६ रोजी ती घरून निघून गेली आणि दि.२९ रोजी तिचा मृतदेह शहरातील तलावात सापडला.
शेफालीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्या. स्वप्निल एस.खटी यांनी सबळ पुरावा आणि युक्तिवाद यावरून आरोपी मंगेश कन्नाके याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपात १० वर्ष सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड अशी शिक्षा दि.१ ला सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकिल एस.यु.कुंभारे यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी पो.निरीक्षक श्याम गव्हाणे व उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांनी केली.