२१ ठिकाणी खांब : चोरी व इतर गुन्ह्यांवर प्रतिबंध बसणार लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रमुख ठिकाणी २१ हायमॉस्ट लाईट लावण्याला मंजुरी दिली असून हायमॉस्ट लाईट लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आठ हायमॉस्ट लाईट लावून पूर्ण झाले आहेत. आरमोरी हे गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती व महत्त्वाचे शहर आहे. दर वर्षी या शहराचा विस्तार वाढत चालला आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी हायमॉस्ट लाईट लावण्याची मागणी राजकीय पदाधिकारी व नागरिकांकडून केली जात होती. हायमॉस्ट लाईटची उंची अधिक राहत असल्याने २०० ते ३०० फूट अंतरावर प्रकाश पडतो. त्यामुळे चोरी व इतर घटनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, या उद्देशाने नगर पंचायतीने मुख्य चौक व महामार्गावर २१ ठिकाणी हायमॉस्ट लाईट लावण्याला परवानगी दिली आहे. सद्य:स्थितीत आठ हायमॉस्ट लाईट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मुख्याधिकारी सतीश चौधरी यांनी दिली आहे. सदर हायमॉस्ट मंजूर करण्यासाठी आपण प्रयत्न केला होता, असा दावा भाजपा कार्यकर्ते नंदू नाकतोडे व युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे यांनी केला आहे. हायमॉस्ट लाईटसोबतच इतर ठिकाणी यानंतर एलईडी बल्ब लावले जाणार आहेत. त्यामुळे नगर पंचायतीचा विजेच्या खर्चात कपात होण्यास फार मोठी मदत होणार आहे. पावसाळा सुरू असतानाही काही ठिकाणचे लाईट बंद स्थितीत आहेत. या ठिकाणी लाईट लावण्याची मागणी आहे.
हायमॉस्टने आरमोरी उजाडणार
By admin | Published: June 25, 2017 1:33 AM