गडचिरोली : गाय वाटप योजनेत गैरव्यवहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने चर्चेत असलेले आयएएस भामरागड येथील तत्कालीन प्रकल्प अधिकारी व सांगली - मिरज - कुपवाडचे विद्यमान महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्याविरुद्ध तक्रारींचा ओघ सुरूच आहे. सोमवारी भामरागडातील एका आदिवासी महिलेने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कैफियत मांडली आहे.
गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार स्वाक्षरी न केल्याने बेघर करण्याची धमकी दिली, काही दिवसांनी खरोखरच माझा संसार रस्त्यावर आणला, मला खोट्या गुन्ह्यात गोवले तसेच पतीला कार्यालयात बोलावून धमकावले, अशी तक्रार भारती इष्टाम या महिलेने केली आहे. भारती इष्टाम या भामरागडच्या रहिवासी असून, त्यांच्याकडे गॅस एजन्सी आहे.
१९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी शुभम गुप्तांवर गंभीर आरोप केले आहेत. गुप्ता हे २०२१-२२ मध्ये भामरागड नगरपंचायतीचे प्रशासक देखील होते. नगरपंचायत इमारतीसाठी ०.९९ हेक्टर जागा हस्तगत करण्यासाठी वनहक्क समितीचा ठराव आवश्यक होता. समितीवर मीदेखील होते.
माझी काहीच प्रतिक्रिया नाहीयासंदर्भात आयएएस शुभम गुप्ता यांना संपर्क केला असता, मला याबाबत काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही, असे उत्तर त्यांनी दिले.
या समितीच्या ठरावासाठी शुभम गुप्ता यांनी कार्यालयात बोलावले. सह्या व ठराव न दिल्यास उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. मी विरोधावर ठाम राहिल्याने माझ्यावर त्यावेळचे तहसीलदार अनमोल कांबळे व नगरपंचायतीचे अधिकारी सूरज जाधव यांच्याकरवी दबाव आणण्यास सुरुवात केली. याचदरम्यान माझ्या गॅस एजन्सीची तपासणी केली, त्यात काही न आढळल्याने मला जागा खाली करायला लावली. त्यानंतर वारंवार पत्र पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली. यादरम्यान माझ्यावर कलम १०७ व कलम १११ अन्वये गुन्हा नोंद केला. शिवाय पतीला धमकावले. माझी मुले शिक्षणासाठी बाहेर होती, मानसिक ताणतणावात त्यांना मी पैसे पुरवू शकले नाही, त्यामुळे त्यांचे शिक्षण सुटले, असेही नमूद करत इष्टाम यांनी गुप्तांवर कारवाईची मागणी केली आहे.