तज्ज्ञांनी सांगितले महत्त्व : चार हजारांच्या भाज्यांची झाली विक्री गडचिरोली : वर्षा ऋतुमध्ये गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात उगवणाऱ्या रानभाज्या आरोग्यवर्धक व स्वस्त असल्या तरी या रानभाज्यांचे महत्त्व शहरी नागरिकांना माहित नाही. या भाज्यांचे महत्त्व व ओळख निर्माण करून देण्याचे काम कृषी महाविद्यालयात गुरूवारी आयोजित रानभाजी महोत्सवाने केले आहे. या महोत्सवादरम्यान एकाच दिवशी चार हजार रूपयांच्या भाज्यांची विक्री करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालयात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. विलास तांबे, सुधा सेता, आत्माच्या अधिकारी प्रीती हिरडकर, डॉ. वामण इंगळे, डॉ. वाघमारे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक कांता मिश्रा, प्रकाश गेडाम, प्रतिभा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. रानभाजी महोत्सवात सुमारे ३४ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यांचे सुमारे ६५ स्टॉल लावण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांनी रानभाज्यांचे महत्त्व पटवून दिले. डॉ. वामण इंगळे यांनी ज्या-ज्या ऋतूमध्ये जे-जे पिकते, ते सेवन करावे, त्यामुळे त्या ऋतूत शरीराला हानिकारक असलेल्या वातावरणापासून शरीराचा बचाव होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. हे ऋग्वेदात सांगितले आहे. रानभाज्या या पावसाळ्यात निघतात. पावसाळ्यात होणारे आजार थांबविण्याची शक्ती रानभाज्यांमध्ये आहे. मात्र रानभाज्या निर्जंतुक करण्यासाठी त्या जास्तीत जास्त शिजवाव्या, असा सल्ला दिला. भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. सदर भाजीपाला शरीरास हानिकारक आहे. मात्र शहरी नागरिकाला ही बाब माहित नाही. रानभाज्यांवर कोणत्याही प्रकारची कीटकनाशकांची फवारणी केली जात नाही. त्याचबरोबर पारंपरिक पालेभाज्यांच्या तुलनेत रानभाज्या स्वस्तात मिळतात. त्यामुळे पारंपरिक पालेभाज्यांना रानभाज्या चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकतात. मात्र यासाठी रानभाज्यांचे महत्त्व शहरी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. रानभाज्यांच्या माध्यमातून ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल, असा आशावाद उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. संचालन कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयक योगीता सानप यांनी केले. यशस्वीतेसाठी कृषी महाविद्यालयाचे प्रा. वाघमारे, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मनोज इंगोले, डॉ. गणेश भगत, डॉ. शुभांगी अॅलेक्झांडर, डी. एन. अनोकार यांच्यासह कर्मचारी प्रशांत सराप, डॉ. विजय काळपांडे, संजय सरोदे, गणेश गणवीर, अजय घोंगडे, विवेक सातार, संतोष घोंगळे, योगेश चौके, गेडाम, मुरतेली, कांबळे, नरवाडे, सलामे, जाधव, भांडेकर, श्याम खुडे, रिंगनाथ व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी) महोत्सवात ३४ प्रकारच्या भाज्या रानभाजी महोत्सवात गडचिरोली, धानोरा, अहेरी, देसाईगंज, सिरोंचा, एटापल्ली, आरमोरी तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील महिला व बचतगटाच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला होता. महोत्सवादरम्यान रानभाज्यांपासून विविध पदार्थ बनवून ते चव घेण्यासाठी ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर महिला मंडळी सदर भाजी कशी बनवावी, याबाबतही माहिती देत होत्या. महोत्सवात मुंगना, अरतफरी, केना, तरोटा, पातूर, लेंगडाभाजी, भस्वलची पाने, धोपा, हरदुलीची कांदे, कुळ्याचा फूल, कोलार, काटवल, भुकडी, शेरडिरे, खापरखुटीची भाजी, उतरण, कामुन्याची भाजी, वर, चेजची भाजी व मटारूचे पान आदी प्रकारच्या भाज्या ठेवण्यात आल्या होत्या. महोत्सवादरम्यान तीन ते चार हजार रूपयांच्या भाज्यांची विक्री करण्यात आली. पळसाच्या पानाच्या पात्रामध्ये बनलेले पदार्थ ठेवून थाली सजविण्यात आली होती. मान्यवरांनीही या पदार्थांचा आस्वाद घेतला.
महोत्सवातून नागरिकांना रानभाज्यांची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 1:19 AM