गडचिराेली : पाेषण टँकर ॲप मराठीत करा, पाेषण टँकरमध्ये सक्तीने इंग्रजीमध्ये माहिती भरण्यासाठी आदेश रद्द करा, अन्यथा जुलै महिन्यात शासनाला माेबाईल परत करणार, असा इशारा देत अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी शासन व प्रशासनाच्या विराेधात मंगळवारी जिल्हा परिषदेसमाेर निदर्शने केली.
आयटक संलग्नित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक देवराव चवळे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमाेर आंदाेलन करून विविध मागण्यांचे निवेदन जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.
महाराष्ट्रात सर्व शासकीय व्यवहार मराठीत व्हावे, असा आदेश आहे. त्यानुसार पाेषण टँकर ॲपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध हाेत नाही. इंग्रजीमध्ये सर्व माहिती भरावी लागते. बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी विशेषत: ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील सेविका, मिनी अंगणवाडीसेविका कमी शिकलेल्या आहेत व त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरता येत नाही. काही ठिकाणी सेविकांच्या जागा रिक्त असल्याने मदतनीसांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांना इंग्रजी येत नाही. लाभार्थी बालकांचा आधारकार्ड क्रमांक जाेडल्याशिवाय व सर्व माहिती इंग्रजीत भरल्याशिवाय त्यांना पूरक पाेषण आहाराचा लाभ मिळू शकणार नाही, अशी जाचक अट पाेषण टँकरमध्ये घालण्यात आलेली आहे. त्यामुळे कामात अडचणी येत असल्याने पाेषण टँकर ॲप मराठीत करावे, अशी मागणी संघटनेसह अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी लावून धरली. निर्णय न घेतल्यास जुलै महिन्यात शासनाला माेबाईल परत करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
आंदाेलनात आयटकचे पदाधिकारी डाॅ. महेश काेपुलवार, सचिव जगदीश मेश्राम, राज्य सचिव देवराव चवळे, दादा बकरे, मीनाक्षी धुळे, मीरा कुरंजेकर, अनिता अधिकारी, जहारा शेख, ज्याेती काेमलवार, कुंदा भंडावार, ज्याेती काेल्हापुरे, रेखा जांभुळे, बसंती अंबादे, शिवलता बावनथडे, आशा चन्ने, अल्का कुनघाडकर, अल्का लावुटकर, लता मडावी आदी उपस्थित हाेते. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव व आयुक्तांना पाठविण्यात आले आहे.