गडचिरोली जिल्ह्यात रबी हंगामात मोठ्या प्रमाणात मका व धानाचे उत्पादन झाले. जिल्हाधिकारी व उप प्रादेशिक कार्यालय आदिवासी विकास महामंडळ गडचिरोली यांनी मका व धान खरेदीकरिता ३० एप्रिल पर्यंतची मुदत दिली; परंतु जिल्ह्यात एकही मका खरेदी केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला मका विक्री करता आला नाही. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाइन न झाल्याने नोंदणी झाली नाही. शासनाने तातडीने मका व धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
बाॅक्स
राममाेहनपुरात गाेदामाची व्यवस्था
राममोहनपूर येथील मका शेतकऱ्यांनी जवळपास १५ लाख रुपयांचा खर्च करून शेतमाल साठवणुकीसाठी गोदाम बांधले आहे. त्यामुळे मका विक्री झाल्यानंतर ते ठेवण्यासाठी गाेदामदेखील आहे; परंतु शासनाने तेथेसुद्धा खरेदी केंद्र सुरू केले नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांविरोधात भूमिका घेत आहे, असा आराेप करीत राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास २५ मेपासून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आ. डॉ. देवराव होळी यांनी दिला.