खासदारांनी भूमिका केली स्पष्ट : मेडिगट्टा-कालेश्वर धरणस्थळाला भेट सिरोंचा : तालुक्यातील पोचमपल्ली गावानजीक तेलंगणा सरकारच्या वतीने प्रस्तावित मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे एकाही घराचे तसेच शेतीचे नुकसान झाल्यास या प्रकल्पाला आपण प्रखर विरोध करणार, अशी भूमिका खा. अशोक नेते यांनी शेतकऱ्यांपुढे स्पष्ट केली. खा. अशोक नेते यांनी शनिवारी मेडिगट्टा-कालेश्वर प्रस्तावित धरणस्थळाला भेट देऊन पाहणी केली. तसेच शेतकरी व गावकऱ्यांशी या संदर्भात चर्चा केली. मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाबाबत विरोधक स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांमध्ये नुकसान होणार असल्याचा गैरसमज पसरवीत आहे. २१ गावे पाण्यात बुडणार असल्याचे विरोधकाकडून सांगितले जात आहे. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असल्याचे कळल्यावर आपण नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करून धरणस्थळाला भेट दिली. माझ्यासोबत तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सिंचाई विभागाचे अधिकारी आहेत. त्यांच्याकडून आपण या प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. आगामी जि.प., पं.स. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही विरोधक चुकीचा गैरसमज पसरवित आहेत, असेही खा. नेते म्हणाले. याप्रसंगी बाबुराव कोहळे, दामोधर अरगेला, सत्यनारायण मंचालवार, रंगू बापू, कलाम हुसैन, संदीप राचर्लावार, रवींद्र ओल्लालवार, डॉ. भारत खटी, विश्रोजवार हजर होते. (शहर प्रतिनिधी)
नुकसान होत असल्यास प्रकल्पाला विरोध करू
By admin | Published: February 07, 2016 2:12 AM