लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात ४ मुख्य, १० उपनद्या तर शेकडो नाले आहेत. तीन महिने त्यांना पूरस्थिती असते आणि उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण हाेते. जिल्ह्यात पाणी भरपूर आहे, मात्र आपणाला त्याचे नियोजन आत्ताच करणे गरजेचे आहे. भविष्यात पाणी वाहते पाहायचे असेल तर, आत्ता पासूनच नियाेजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. पाटबंधारे विभागाच्या जल दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, समाजसेवक देवाजी तोफा, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम, डॉ. सविता सादमवार, मनोहर हेपट, अनूप कोहळे, उपस्थित होते.प्रशासन विविध स्तरावर जलजागृती मोहिमा राबवित असते, योजनांची अंमलबजावणी करीत असते. परंतू काय करायचे ते लोकांनीच ठरविणे आवश्यक आहे. प्रशासनावर अवलंबून न राहता लोकसहभागातून तसेच प्रत्यक्ष कृतीमधून पाण्याविषयी कामे होणे गरजेचे आहे. शासन मार्गदर्शकाची भूमिका विकासात्मक प्रक्रियेत पार पाडत असते. म्हणून लोकांनी स्वत: पुढे येऊन पाण्याचे नियोजन करून विविध क्षेत्रात विकास साधला पाहिजे असे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले.जल जागृती सप्ताहामध्ये राबविण्यात आलेल्या कार्यक्रमातील व स्पर्धांमधील विजेत्यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.देवाजी तोफा यांनी जिल्ह्यातील पाणी विषयाची कामे स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विचार करून, येथील रूढी, परंपरा व संस्कृतीचा विचार करून करावीत असे मत व्यक्त केले. मन व्यवस्थापन, जन व्यवस्थापन, वन व्यवस्थापन व जल व्यवस्थापन यातून आपल्याला आपला हेतू साध्य करता येईल असे मत यावेळी देवाजी तोफा यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता अविनाश मेश्राम तर आभार उपकार्यकारी अभियंता गणेश परदेशी यांनी मानले.