विसोरा : गडांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पाचव्या क्रमांकाचे आणि देसाईगंज तालुक्यातील एकमेव पर्यटनस्थळ डोंगरमेंढाकडे सोयीसुविधांच्या अभावी पर्यटकांनी पाठ फिरविली आहे. या भागाच्या विकासासाठी शासनाने लक्ष देऊन या भागात पर्यटकांचा ओघ वाढवावा, अशी मागणी या भागातील जनतेने केली आहे. देसाईगंजपासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या या पर्यटनस्थळाची अद्याप जिल्ह्यातील नागरिकांनाही माहिती नाही. येथे विलोभानीय तलाव व महादेवाचे मोठे मंदिर आहे. हा परिसर निसर्गरम्य परिसर आहे. अॅड. ज्ञानदेव परशुरामकर आणि डोंगरमेंढावासीयांनी १९९७ मध्ये या महादेव मंदिराचा जीर्णोध्दार केला. तेव्हापासून आजतागायत महाशिवरात्रीला या शिवतीर्थावर मोठी यात्रा भरते. संपूर्ण परिसरातील नागरिक या यात्रेत सहभागी होतात. मागील पंचवार्षिक योजनेत जिल्हा परिषदेने या स्थळाला पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले. दरवर्षी या योजनेंतर्गत पाच हजार रुपये यात्रा अनुदान मिळते. ही रक्कम अतिशय तोकडी आहे. मंदिरालगतचा तलाव म्हणजे वन्यप्राण्यांसाठी हक्काचा पाणवठा आहे. येथील मंदीराच्या टेकडीची एक बाजू पूर्णपणे सपाट असून दुसऱ्या बाजूस घनदाट जंगल आहे. त्यामळे पर्यटनाच्या दृष्टीने येथे ट्रेकिंगसोबतच तलावात नौकाविहाराची सोय होऊ शकते.
डोंगरमेंढाच्या विकासाकडे दुर्लक्ष
By admin | Published: November 06, 2014 1:36 AM