कान्होलीतील प्रकार : प्रशासन उदासीन लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : ग्रामीण भागातील दळणवळणाची समस्या लक्षात घेत शासन व प्रशासनाकडून विविध विकास योजनेच्या कामातून रस्त्याचे काम केले असले तरी या कामात मोठी हयगय केल्याने अल्पावधीत रस्ते बकाल झाल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे. असाच प्रकार चामोर्शी तालुक्यातील कान्होली येथे निर्माण झाला असून गावातील रस्त्यावर मधोमध्य खड्डा पडला असून हा खड्डा अपघातास आमंत्रण देत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने या खड्ड्यापासून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चामोर्शी तालुक्यातील कान्होली गावातील जितेंद्र भसारकर यांच्या घराशेजारी असलेल्या चौकातील रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे. गावातील बहुतांश नागरिक याच रस्त्यावरून ये- जा करीत असतात. विशेष म्हणजे या खड्ड्यावर काटेरी झाडांच्या फांद्या तोडून ठेवले असल्याने हा दृष्टीस पडणे दुरापास्त होत आहे. त्यामुळे अनेकजणांना या खड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील रस्ते सिमेंट काँक्रीट असून काही अंतर्गत अजुनही खडीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. गावातील वाल्मिकी मंदिर ते विजय गोहणे यांच्या घरापर्यंत नालीकाम करण्यात आले असून नाल्या उंच व रस्ता नाली बांधकामाच्या खाली गेल्याने पावसाळ्यातील पाण्याचा निचरा होत नसल्याची परिस्थती निर्माण झाली आहे. शिवाय वडूले यांच्या घराशेजारील विहीर नादुरूस्त असून ग्रा. पं. सदस्य जीवन म्हशाखेत्री यांनी स्व:खर्चातून या विहिरीची किरकोळ दुरूस्ती केली. गावाचा विकास लोकप्रतिनिधींवर अवलंबून असतानाही येथील विकासकामे ठप्प पडली आहेत. लोकप्रतिनिधींनी विकासाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष
By admin | Published: May 08, 2017 1:37 AM