भामरागड : वीजपुरवठा नसलेल्या दुर्गम गावांमध्ये सौरदिव्यांची व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात आली. परंतु, या सौरदिव्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. काही ठिकाणच्या सौरदिव्यांच्या बॅटरीची चोरी झाली, तर काही ठिकाणी सौर प्लेट लंपास करण्यात आल्या आहेत. सौरदिवे बसविण्यासाठी शासनाने केलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. लखमापूर बोरी परिसरातील गावांमध्ये सौरदिवे दुर्लक्षित आहेत.
टिल्लूपंप जप्तीची मोहीम सुरू करा
गडचिरोली : उन्हाळा असल्याने पाण्यासाठी टिल्लूपंपांचा वापर वाढला आहे. नगर परिषदेतर्फे टिल्लूपंपधारकांवर कारवाई केली जात नसल्याने त्यांची हिंमत वाढत चालली आहे. त्यामुळे टिल्लूपंपांची संख्याही वाढत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेने टिल्लूपंप पकडण्याची मोहीम सुरू करावी, अशी मागणी आहे. अनेक कुटुंबांकडे पाणी साठवून ठेवण्यासाठीचे साहित्य उपलब्ध नसल्याने अशा कुटुंबीयांची अल्प पाणीपुरवठ्यामुळे मोठी अडचण झाली आहे.
आमगावच्या हेमाडपंथी मंदिराचा विकास करा
आमगाव (म.) : तालुक्यापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव (म.) येथील हेमाडपंथी मंदिर जीर्ण व दुरवस्थेत आहे. मात्र, याकडे पुरातत्व विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत आहे. येथील देवालयात ऋषीची मूर्ती, शिवपिंड, नंदी, अष्टविनायक, लक्ष्मी नारायण, शिवपार्वती, हत्ती, घोडे, हनुमान, महाकालीचे देवालय, खोदकामामध्ये सापडलेली नाणी, शिलालेख, टाकीच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे या मंदिराचा विकास करावा, अशी मागणी होत आहे. चामोर्शी तालुक्यात आष्टी, चपराळा भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे आहेत.
धोडराज-इंदेवाडा मार्गाची दुरुस्ती करा
लाहेरी : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ते इंदेवाडा या मार्गाची खड्ड्यांमुळे वाताहत झाली आहे. हा मार्ग पूर्णत: उखडला असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तालुका मुख्यालयाशी जोडण्याकरिता १९९८ मध्ये या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्यामुळे अतिदुर्गम भागातील गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याची मोठी सोय झाली. परंतु, देखभाल व दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले.
कुटुंब नियोजनाबाबत जनजागृतीची गरज
गडचिरोली : लोकसंख्येला आळा घालण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती झाल्यानंतर कुटुंब नियोजन करण्याचे प्रमाण वाढले असले तरी यामध्ये पुरुषांचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. कुटुंब नियोजनात महिला आघाडीवर आहेत. पुरुषांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे.
तंटे मिटविण्यात समित्या अपयशी
धानोरा : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येते. गावात भांडण, तंटे वाढत आहेत. मात्र, समित्या तंटे मिटविण्यात अपयशी ठरत आहेत. जिल्ह्यातील तंटामुक्त समित्या प्रेमीयुगुलांचे विवाह लावून देण्यात पुढाकार घेत असल्याचे चित्र आहे.
मार्गाच्या बाजूला वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील चारही मुख्य महामार्गांच्या बाजूला ट्रक व इतर वाहने उभी ठेवली जातात. अनेकांकडे जागा नसतानाही वाहने खरेदी केली आहेत. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या वाहनांवर कारवाई करावी.
कुपोषित भागामध्ये परसबागेची गरज
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे.
गतिरोधकाअभावी अपघातास आमंत्रण
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते.
मानधनाअभावी वृद्ध कलावंतांची ससेहोलपट
देसाईगंज : ग्रामीण भागात समाज प्रबोधनाचे मुख्य अंग असलेल्या नाटकातील नाट्य कलावंत आजही उपेक्षितच आहेत. कित्येक कलावंतांपुढे वृध्दापकाळामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐेरणीवर आहे. शासनाचे मात्र या झाडीपट्टीतील कलावंतांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
तहसील कार्यालयातील रिक्त पदे भरा
चामाेर्शी : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिक वर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने या योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
शहरातील डुकरांचा बंदोबस्त करा
गडचिराेली : शहरात डुकरांचा धुमाकूळ वाढला आहे. नगर पंचायतीचे या डुकरांकडे दुर्लक्ष होत आहे. डुकरांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नालीमध्ये दिवसभर डुकरांचा वावर राहत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.