वैरागड : महसूल विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे आरमोरी तालुक्यातील वैरागड भागातील गोरजाई घाटावर गेल्या १०-१२ दिवसांपासून रेतीचा क्षमतेपेक्षा अधिक उपसा होत असून अवैध उत्खनन सुरू आहे. पर्यावरण विषयक परवानगीच्या अटीचे काटेकोर पालन करणे व या अटींचे उल्लंघन करणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाची आहे. मात्र गोरजाई घाटावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननामुळे महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे दिसून येते. यंदा गोरजाई रेतीघाट लिलावासाठी खुला करण्यात आला. आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील चार नदी घाटांचा मंजूर रेती घाटांच्या यादीत समावेश आहे. खोब्रागडी नदीवरील वैरागड, वैरागड ते करपडा मार्ग, वैरागड-मानापूर घाट, वैरागड ते विहीरगाव आदी रेती घाटांचा समावेश आहे. ग्राम पंचायतींनी गोरजाई डोहघाटाचा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा, कारण या घाटावर मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा असून चोरट्या मार्गाने काही लोक येथे अवैध रेतीचा उपसा करीत आहेत. प्रत्येक रेती घाटातून उत्खननासाठी देण्यात येणारी जागा ठरवून दिल्या जाते. मात्र संबंधित रेती कंत्राटदार क्षमतेपेक्षा अधिक उपसा करीत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी होत आहे. रेती व इतर गौण खनिजांचे उत्खनन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार झाली असली तरी क्षमतेपेक्षा अधिक उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केव्हा होणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिक विचारीत आहेत. याकडे महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)
गोरजाई घाटातून रेतीचे अवैध उत्खनन
By admin | Published: October 16, 2015 1:56 AM