लाेकमत न्यूज नेटवर्कधानोरा : राजोली नदीपात्रालगतच्या शेतातून अवैधरीत्या शेकडो ब्रास रेती चे उत्खनन करण्यात आल्याच्या माहितीवरून चातगावचे मंडळ अधिकारी व्ही. एन. मुपीडवार, दुधमाळाच्या तलाठी छाया टेकाम यांनी १० मार्च राेजी पंचनामा केला असता ३७१ ब्राॅस रेतीचे आगाऊ खनन केले असल्याचे आढळून आले आहे. धानोरा तालुक्यातील मिचगाव येथील शेतकरी लालाजी विठाेबा कुदेशी यांची शेती राजाेली नदीपात्रालगत आहे. पुरामुळे शेतात वाहून आलेल्या ०.६५ हेक्टर आर जागेतील रेती उत्खनन करण्याची त्यांनी रीतसर परवानगी घेतली. त्यानुसार त्यांना दिनांक २४ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत ४७८ ब्रास रेती उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार उत्खननास सुरुवात करण्यात येऊन शेतातील रेती डम्पिंग करून विविध वाहनाद्वारे विक्री करण्यात येत आहे. दररोज ट्रक, ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक सुरू आहे. त्यामध्ये मंजूर रॉयल्टीपेक्षा अधिकचे खनन झाल्याच्या कारणावरून मंडळ अधिकाऱ्यांनी माेका चौकशी करून मोजमाप केले असता ३७१ ब्रास रेती अवैधपणे उत्खनन केल्याचे आढळून आले. तेथे असलेली जेसीबी व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. असे असले तरी उत्खननाचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. उत्खनन स्थळावर जाऊन पाहिले असता रॉयल्टीपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे दिसून येते सदर प्रकरणात काय कारवाई केली जाते. याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. याबाबत तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांना विचारले असता शेतमालकाला नोटीस देण्यात आली असून, १५ तारखेला तहसील कार्यालयात बोलावण्यात आले आहे.
रेती चोरी करणारा ट्रॅक्टर जप्तवैरागड: वन विभागाने बुधवारी पहाटे खोब्रागडी नदी पात्रात सापळा रचून रेतीची चोरी करणारा ट्रॅक्टर जप्त केला आहे. जप्त केलेल्या ट्रॅक्टर विकास पोटे रा. विहीरगाव यांच्या मालकीचा आहे. खोब्रागडी नदीची रेती चोरून ती विकण्याचा गोरख धंदा मागील अनेक दिवसापासून काही ट्रॅक्टर मालक करीत आहेत ही बाब वन विभागाच्या लक्षात आल्यानंतर दि.१० मार्च रोजी पहाटे आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, वनरक्षक विकास शिवणकर, विनोद कवडो यांनी सापळा रचून ट्रॅक्टर जप्त केला. या ट्रॅक्टरवर अंदाजे १लाख १२ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्राप्त माहितीनुसार आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार यांनी बुधवारच्या पहाटे खोब्रागडी नदीत तीन ट्रॅक्टर पकडले होते, पण दाेन ट्रॅक्टर रिकामे असल्याने ते साेडण्यात आले.