गडचिरोली : अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे दर रविवारी व राजाराम खांदला येथे दर गुरुवारी मागील काही दिवसांपासून अवैध कोंबडा बाजार मोठ्या जोमाने सुरू आहे. याठिकाणी परिसरातील शेकडो नागरिक कोंबडा बाजारात जुगार खेळत असून यामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. मात्र, याकडे पाेलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.
कोंबडा बाजारावर जिल्ह्यात सर्वत्र बंदी घालण्यात आली आहे. असे असतानासुद्धा बेधडकपणे काेंबडा बाजार भरविला जात आहे. छल्लेवाडा हे गाव रेपनपल्ली उप पाेलीस ठाण्यांतर्गत येते. तर, राजाराम खांदला येथेच उपपाेलीस ठाणे आहे. दाेन्ही काेंबडा बाजारात काेंबड्यांची शर्यत लावण्याबराेबरच लाखाे रुपयांचा जुगार खेळला जात असून पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे जुगारासह अनेक अवैध धंदे येथे जोरात सुरू आहेत.
या परिसरात देशी-विदेशी दारुची खुलेआम विक्री केली जात आहे. काेंबडा बाजार भरत असताना स्थानिक पाेलिसांच्या ही बाब लक्षात नाही काय? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यापूर्वी या ठिकाणी कोंबडा बाजार सुरू असताना नक्षल्यांनी एका एसपीओची हत्या करून त्याची दुचाकी जाळली होती, हे विशेष.