गडचिरोली : स्थानिक एसडीपीओ कार्यालयात पोलीस व मुक्तिपथची उपविभागीय बैठक पार पडली. या बैठकीत गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी या तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी नियोजन करण्यात आले. शहरी व ग्रामीण भागातील अवैध दारू व तंबाखूचे प्रमाण कमी करण्याचा निर्धार यावेळी तिन्ही पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी केला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब जाधव, मुक्तिपथ अभियानाचे संचालक डॉ. मयूर गुप्ता, आरमोरीचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, चामोर्शीचे नागनाथ पाटील, गडचिरोलीचे ठाणेदार दामदेव मंडलवार, एपीआय पूनम गोरे, मुक्तिपथचे आरमोरी तालुका संघटक नीलम हरिणखेडे, चामोर्शीचे आनंद इंगळे व गडचिरोलीचे अमोल वाकुडकर, गणेश कोलगिरे उपस्थित होते.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्यासह मुक्तिपथची बैठक झाली होती. त्यामध्ये ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला. त्या अनुषंगाने गडचिरोलीत उपविभाग स्तरावर बैठकीचे आयोजन करून अवैध दारू व तंबाखूविरोधात कारवाई करण्यासाठी चर्चा करण्यात आली. आरमोरी, चामोर्शी व गडचिरोली ही जिल्ह्यातील मुख्य ठिकाण आहेत. या शहरातील अवैध व्यवसायावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. यासाठी मुक्तिपथच्या समन्वयातून ठाणेदारांनी प्रयत्न करण्याचे आवाहन डॉ. गुप्ता यांनी केले. सोबतच निर्माण होणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शन केले. ज्या गावात किंवा वाॅर्डात रेड टाकणे आहे. त्या गावातील पोलीस पाटील यांनी अवैध दारू विक्रेत्यांची माहिती देणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस पाटील यांना प्रशिक्षण देणे. ड्रंक अँड ड्राइव्ह कायद्याची अंमलबजावणी करणे. १८ पेक्षा कमी वयाच्या मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे. दर दोन महिन्यांतून उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह बैठक घेऊन तालुक्यात आलेल्या अडचणींवर चर्चा करून निर्णय घेणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. ग्रामीण व शहरी भागातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करीत तालुक्यातून दारू, तंबाखूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे तिन्ही ठाणेदारांनी ठरविले.