लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : सती नदीच्या कुरखेडा या रेतीघाटातून संबंधित कंत्राटदाराने रेती काढणे सुरू केले आहे. मात्र, सर्व शासकीय सूचना आणि नियम धाब्यावर बसवत टिप्परने दिवसरात्र नियमबाह्यपणे रेती वाहतूक केली जात असल्याने पर्यावरणाची ऐसीतैसी होण्यासोबत कुंभीटोलावासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कुरखेडापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभीटोला येथील रेती घाटातून मागील आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून ती रेती साठवणूक करून विकली जात आहे. कुंभीटोला येथील स्मशानभूमीतून रेती वाहतुकीसाठी जेसीबीने मार्ग तयार करून संबंधित कंत्राटदाराने कुंभीटोलावासीयांची मने दुखावली आहेत. अनेक नागरिकांच्या पूर्वजांचे मृतदेह त्या स्मशानभूमीत पुरले आहेत. त्याच्यावरून जेसीबी व टिप्पर चालवून गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुंभीटोला येथील नागरिकांनी केली आहे. दोन दिवसांत या रेती प्रकरणाची सखोल चौकशी झाली नाही तर कुंभीटोलावासीयांनी आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. कुंभीटोला गावातून जड वाहतूक बंद झाली पाहिजे, शंकरपट व खेळाच्या मैदानावर जड वाहतूक करू नये, कुंभीटोला डांबरीकरण रस्त्याची दुरवस्था झाली तर संबंधित ठेकेदाराकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अधिकाऱ्यांनी घेतले झोपेचे सोंग- या अगोदर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी रात्री-बेरात्री व दिवसाढवळ्या ट्रॅक्टरमध्ये रेती नसताना ट्रॅक्टर जप्त करून कारवाई केल्याचे बोलले जात आहे. सोबतच ज्या ठिकाणी रेती टाकली त्या रेतीचा पंचनामा करून कारवाई केल्याचे निदर्शनास आले आहे, पण कुरखेडा घाटातील रेती ठेकेदारावर मात्र कुठलीच कारवाई न करता विशेष मेहरबानी दाखविली जात असल्याने प्रशासकीय यंत्रणेचे त्याला पाठबळ तर नाही ना? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पर्यावरणाच्या नियमांची ऐसीतैसी - पर्यावरण विभागाच्या नियमानुसार परवानगी दिलेल्या खोलीपेक्षा अधिक खोलवर जाऊन रेती काढता येत नाही. तसे निदर्शनास आल्यास लिलावधारकांकडून घेण्यात आलेली अनामत रक्कम जप्त करून तो रेती उपसा अवैध ठरविला जातो. त्याचा परवाना सुद्धा रद्द केला जातो. - लिलावधारकाला नियमानुसार यंत्रसामग्री नदीपात्रात उतरवता येत नाही. वाहनात वाळू भरण्यासाठी पोकलेन किंवा जेसीबीसारख्या यांत्र वापरावर बंदी आहे. मात्र, हे सारे नियम धाब्यावर बसवून रेती काढली जात आहे.