बसस्थानकावर खासगी वाहने : क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांचा भरणाएटापल्ली : येथील बसस्थानकावर खासगी काळी-पिवळी वाहने उभी करून मोठ्या प्रमाणावर क्षमतेपेक्षा प्रवाशांचा भरणा करून अवैध वाहतूक केली जात आहे. त्यामुळे एटापल्लीत अपघाताची शक्यता बळावली आहे. मात्र या प्रकाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. एटापल्ली येथील बसस्थानकावर काळी-पिवळी वाहनांनी कब्जा केल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसना स्थानकापासून दूरच राहावे लागत आहे. दररोज एटापल्ली येथून विविध मार्गांनी काळी-पिवळी वाहने चालविली जातात. मात्र या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविले जात आहेत. जवळपास २० हून अधिक प्रवासी एका वाहनात बसविले जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. बस सुटण्यापूर्वी सदर खासगी वाहने सोडली जात असल्याने बसमधून जाण्यास प्रवासी उरत नाही. परिणामी महामंडळाला चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे काळी-पिवळी वाहनधारकांना वेगळी जागा उपलब्ध करून बसस्थानकावर खासगी प्रवासी वाहनांना बंदी घालावी, तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सचिन मोतकुरवार यांनी केली आहे. एटापल्ली-आलापल्ली मार्गावर अनेक बसेस सोडल्या जातात. परंतु वेळापत्रकाचे योग्य नियोजन नसल्याने एकापाठोपाठ दोन ते तीन बसेस सोडल्या जातात. परिणामी याचा फटका प्रवासी व महामंडळालाही बसत आहे.एसटी महामंडळाच्या या भोंगळ कारभारामुळे तसेच नियोजन शून्यतेमुळे प्रवासीही त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
एटापल्लीत अवैध वाहतूक
By admin | Published: February 09, 2016 1:05 AM