नागपूर : राज्य पोलीस दलात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संबंधाने निर्माण झालेले वातावरण आणि अशात आपल्याकडे आलेली गृहमंत्री पदाची जबाबदारी म्हणजे एक मोठे आव्हान आहे, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना नोंदवले.गृहमंत्र्यांचा पदभार सांभाळल्यानंतर वळसे पाटील पहिल्यांदाच नागपुरात आले. आज सकाळी गडचिरोलीत घडलेल्या चकमकीचे वृत्त कळताच ते तिकडे गेले. सायंकाळी गडचिरोलीतून परतल्यानंतर त्यांनी स्थानिक शीर्षस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यानंतर पोलीस जिमखाण्यात पत्रकारांशी अनोपचारिक संवाद साधला. ते म्हणाले, सध्या राज्य पोलीस दलात एका वेगळ्या प्रकारचे वातावरण आहे. पोलिसांनी आपली प्रतिमा प्रामाणिक आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तरच नागरिक त्यांच्यावर विश्वास करतील. त्यांचा हा कटाक्ष राज्य पोलिस दलातील भ्रष्टाचाराचे आरोप जडलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संबंधाने होता.
आयपीएस अधिकाऱ्याच्या बदल्याच्या संबंधाने लागलेले आरोप-प्रत्यारोप आणि घडणाऱ्या घडामोडी या संबंधाने गृहमंत्री वळसे-पाटील फारसे बोलले नाही. मात्र कोरोनामुळे राज्य एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे. अशात आपल्याकडे गृहमंत्री पदाची जबाबदारी येणे म्हणजे एक मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले. अभ्यास आणि नियोजन करून आपण पोलीस विभागासाठी काही नवीन उपाय योजना अमलात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.नागपुरात शारीरिक दुखापतीचे गुन्हे जास्त आहेत. मात्र, पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि त्यांचे सहकारी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत, असेही ते म्हणाले. पोलीस भरतीसाठी तीन लाख अर्ज आले. भरती प्रक्रियेच्या संबंधाने लवकरच ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. यावेळी पोलिस आयुक्त अमितेशकुमार हजर होते.गडचिरोली पोलिसांचे कौतुक २१ मे २००९ रोजी नक्षल्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. गडचिरोली पोलिसांनी केलेली आजची ही कारवाई बदला नव्हे, तर एक योगायोग आहे. नक्षल्यांना कंठस्थान घालणाऱ्या आजच्या कारवाईबद्दल त्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.