लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : कोरोनासह विविध संकटांमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे आणि निसर्गानेही त्याच्यावर अवकृपा दाखविली आहे. २४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी वारा, गारपीटसह अवकाळी पाऊस झाल्याने तालुका मुख्यालयासह इतरही गावांतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे, कोसळलेल्या घरांचे व आदी नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निर्देश आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.२४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला होता. गारपीटसह झालेल्या या वादळी पावसात शहरातील व अन्य गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांची घरे कोसळली. तर अनेकांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तत्काळ सिरोंचा दौरा करून स्थानिक तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अवकाळीचा आढावा घेत नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी या उदात्त हेतूने तत्काळ मोका पंचनामा करण्याचे निर्देश दिले.एवढेच नव्हे तर तालुक्यातील कुठल्याही गावात एकही नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी मदतीपासून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश दिले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी उपस्थित होते.
नुकसानग्रस्तांसोबत साधला थेट संवाद- सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने अनेकांचे नुकसान केले. याची माहिती मिळताच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तालुक्यातील विविध गावांत प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानग्रस्तांशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली. स्थानिक नगरपंचायत हद्दीतील काही प्रभागातसुद्धा त्यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाकडून त्वरित नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.- दरम्यान यावेळी सिराेंचा तालुक्यासह अहेरी उपविभागातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. काही नागरिकांनी रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, वीजबिल आदीबाबत तक्रारी मांडल्या. या तक्रारीचे निरसन करण्याची विनंती आ.धर्मरावबाबा आत्राम यांना यावेळी केली.