गडचिरोली : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना अडचण निर्माण होत आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना ग्रामीण भागात शाखा स्थापन करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.
रेपनपल्ली-कमलापूर रस्त्याची दुरवस्था
कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमी रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले असून आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुध्दा जीर्ण अवस्थेत आहेत.
प्रसूतीगृह निर्मितीचे बांधकाम रखडले
अहेरी : तालुक्यातील उपकेंद्रांमध्ये प्रसूतीगृह निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, यातील काही उपकेंद्रातील प्रसूतीगृहांचे बांधकाम रखडले आहे. संस्थेअंतर्गत प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी सदर प्रसूतीगृहांचे बांधकाम होणे गरजेचे आहे.
मार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातास आमंत्रण
आरमोरी : सायगाव मार्गावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून या मार्गावर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांचे कित्येकदा अपघात घडले आहेत. रात्रीच्या सुमारास मोठा खड्डा दुचाकीस्वारांना दिसत नसल्याने अपघातास आमंत्रण मिळत आहे. अशाप्रकारचे खड्डे या मार्गावर अनेक ठिकाणी अद्यापही कायम आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
ताडीमध्ये रासायनिक द्रवाची भेसळ
एटापल्ली : एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा तालुक्यात ताडी प्रसिध्द आहे. मात्र काही नागरिक ताडीमध्ये रासायनिक द्रव मिसळून त्याची विक्री करीत असल्याचे प्रकार वाढत चालले आहेत. सदर ताडी आरोग्यास अतिशय घातक आहे. रासायनिक द्रव न मिसळलेली ताडी आरोग्यासाठी लाभदायक आहे.
निधीअभावी पंचायत समितीचे महत्त्व घटले
अहेरी: ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून पंचायत समितीकडे बघितले जाते. मात्र, मागील काही दिवसांपासून पंचायत समितीला निधीच उपलब्ध करून दिला जात नसल्याने पंचायत समितीचे महत्त्व कमी झाले आहे.
पाणीपुरवठा योजनांची कामे थंडबस्त्यात
कुरखेडा : जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनांच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, मध्यंतरी निधीच मिळाला नसल्याने अनेक योजनांचे काम बंद पडले आहे. तर काही कामे कंत्राटदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे थांबले आहेत. काही दिवसांतच उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या योजनांची कामे त्वरित मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.
बसस्थानक परिसरात खासगी टॅक्सींचे अतिक्रमण
धानोरा : गडचिरोली-धानोरा-मुरूमगाव मार्गावर सध्या चारचाकी व दुचाकी वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. धानोराचे बसस्थानक रस्त्यालगतच आहे. स्वतंत्र जागा नसल्याने काळीपिवळी टॅक्सी व इतर खासगी बसेस या ठिकाणी अतिक्रमण करून दररोज अनेक प्रवासी बसवून वाहतूक सुरू आहे.
अनेक कर्मचारी संगणकाबाबत अज्ञानी
गडचिरोली : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
कार्यालयातील थम्ब मशीन सुरू करा
गडचिरोली : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील थम्ब मशीन बंद पडल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे उशिरा येणे सुरू झाले आहे. याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे थम्ब मशीन तत्काळ सुरू कराव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे.
निस्तार डेपो देण्याची मागणी
चामोर्शी : तालुक्यातील अनेक गावांत निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी होत आहे. चामोर्शी भागातील नगारिकांना सांस्कृतिक कार्यक्रम व अंत्यविधीसाठी इतर ठिकाणाहून लाकडे आणावी लागत आहेत.
चातगाव-रांगीमार्गे अवैध प्रवासी वाहतूक जोरात
चातगाव : चातगाव- रांगीमार्गे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसची सुविधा नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे. खासगी वाहनाने वाहतूक होत असल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. या भागात उपप्रादेशिक परिवहन विभागाने तपासणी मोहीम सुरू करावी.