जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी खरीप हंगाम पूर्व नियोजनाची आढावा बैठक झूम मिटिंगद्वारे पार पडली. या बैठकीला खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, विभागप्रमुख उपस्थित होते.
खासदार अशोक नेते यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी ५० हजार रुपये प्रोत्साहन रक्कम देण्यात आली नाही, ती त्वरित देण्यात यावी. शेतकऱ्यांसाठी शासनाने घोषित केलेले प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस अजूनही दिलेले नाही ते त्वरित देण्यात यावे. शासनाकडून गरीब नागरिकांसाठी दोन महिन्यांचे राशन मोफत देण्यात येत आहे. त्या राशनचा सुरळीत पुरवठा करून नागरिकांना राशन वाटप करण्यात यावे. मका खरेदी तातडीने सुरू करून गोडावून उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश यावेळी खासदार नेते यांनी दिले.
तसेच शेतकऱ्यांना बांधावर बियाणे देण्याची योजना सुरू करण्यात आली मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही ती सुरू करून शेतकऱ्यांना बांधावर बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे. सिरोंचा, भामरागड, एटापल्ली व अहेरी तालुक्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खतासाठी वडसा येथील रॅक पॉईंट दूर पडत असल्याने मंचेरीयल येथे रॅक पॉईंट सुरू करून शेतकऱ्यांना रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात यावे. पीक कर्जवाटपाचे नियोजन करून शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे.
बाॅक्स
कोरोनाबाबतचे समज-गैरसमज दूर करा
कोविडचे नियम पाळून गुजरी व आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्रातील नागरिकांमध्ये कोरोनाबाबत असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे त्यासाठी जनजागृती शिबिर घेऊन आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करण्यात यावे व लसीकरणासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात यावे आदी बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली.