गडचिराेली : नाकाबंदीदरम्यान पाेलिसांच्या अंगावर वाहन चालवून त्यांना ठार मागण्याचा प्रयत्न करणाऱ्या आराेपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने पाच वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
हरीमाेहन हजारी हलदर रा.सुभाषग्राम पाे.गुंडापल्ली ता.मुलचेरा असे शिक्षा झालेल्या आराेपीचे नाव आहे. २४ ऑक्टाेबर, २०१० राेजी पाेलीस उपनिरीक्षक सचिन सीताराम सानप, एस.व्ही. सस्ते व सी-६० कमांडंट हे माेदुमडगू गावाजवळ रात्रीच्या सुमारास नाकाबंदी करीत हाेेते. दरम्यान, वेलगूरवरून आलापल्लीकडे एमएच ३४ ए.ए. २३४७ क्रमांकाची कार भरधाव वेगाने जात हाेती. कारला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, कार चालकाने पाेलिसांच्या अंगावरूनच कार चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र, समयसूचकता दाखवत पाेलीस बाजूला झाल्याने माेठा अपघात टळला. त्यानंतर, पाेलिसांनी कारचा पाठलाग करायला सुरुवात केली असता, कार चालकाने हँड ब्रेक दाबले. त्यामुळे पाेलिसांचे वाहन कारला धडकून पाेलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले. कारची तपासणी केली असता, कारमध्ये ४८ हजार रुपये किमतीची देशी व विदेशी दारू आढळून आली. आराेपीविराेधात सबळ पुरावे आढळून आल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.सी.खटी यांनी आराेपीला पाच वर्षांचा सश्रम कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सरकारी पक्षातर्फे ॲड.एस.यू. कुंभारे यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पाेलीस उपनिरीक्षक नारायण बच्चलवार यांनी काम पाहिले.