लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा मार्गावरील स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेच्या मागे आहे. हा परिसर क्रांतिनगर नावाने ओळखला जातो. ऐन पावसाळ्यात येथे नालीच्या कलवर्टचे बांधकाम सुरू असल्याने नेहमीचा रस्ता बंद आहे. त्यामुळे येथील नागरिक एका व्यक्तीच्या खासगी जागेतून जात होते; पण तेथे मुरूम व मातीचे ढीग केल्याने हा मार्गसुद्धा बंद झाला. विशेष म्हणजे, रस्ता वगळून दोन्ही बाजूने नाली बांधलेली आहे. शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी असलेला हा परिसर अतिदुर्गम गावांप्रमाणे संपर्कहीन झाला आहे.
मागील काही वर्षांत स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या मागे असलेल्या परिसरात अनेक घरांची निर्मिती झाली. त्यांनी ज्यांच्याकडून प्लॉट खरेदी केला त्या ले-आऊटधारकांनी येथे वीजखांब व पथदिवे लावून दिले; पण येथे शुद्ध पेयजलासाठी नळाद्वारे पाणीपुरवठा व सिमेंट काँक्रीटचा पक्का रस्ता, अशा मूलभूत सुविधांचा अभाव आहे. येथील नागरिकांना कच्च्या रस्त्याने ये-जा करावी लागते.
गडचिरोली नगर परिषदेची सीमा स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या पुढे असलेल्या नाल्यापर्यंत आहे. क्रांतिनगर या नाल्याच्या अलीकडे असल्याने पालिकेंतर्गत येते. पालिकेच्या डी. पी. प्लॅनमध्येही या परिसराचा अंतर्भाव आहे. तरीही सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील नवीन वस्त्यांमध्ये सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोपही नागरिकांचा आहे.
खासगी जागेतून रहदारीचाही मार्ग बंदकांतिनगरात कलवर्ट बांधण्यात येत आहे. हे काम अर्धवट असल्याने नागरिक एका व्यक्तीच्या जागेतून कसेबसे वाहन चालवत जात होते. पण त्या व्यक्त्तीने जेथून वाहने जायची नेमक्या त्याच ठिकाणी मुरूम, मातीचे ढिगारे टाकल्याने हा पर्यायी मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे येथून मुख्य महामार्गापर्यंत जाणेच अशक्य झाले आहे.
लोकवर्गणीतून नागरिकांनी टाकला मुरूमक्रांतिनगरात पक्का रस्ता निर्माण करण्याची मागणी अनेकदा करूनही नगर परिषद प्रशासनाने लक्ष दिले नाही. अखेर येथील नागरिकांनी एकत्र येऊन लोकवर्गणी काढत या रस्त्यावर स्वखर्चातून मुरूम टाकला.
मागणी नसतानाही बांधली नालीखरेतर येथे रस्त्याची नितांत गरज व मागणी असताना त्याकडे लक्ष न देता नगर परिषदेने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कुणीही मागणी केली नसताना मोठ्या नालीचे बांधकाम सुरू केले, ही नालीसुद्धा रस्ता वगळून दोन्ही बाजूने बांधण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात समस्या निर्माण झाली.