८५.५७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण : प्लाटिनम ज्युबिली स्कूलचा कार्तिकेय जिल्ह्यात प्रथम लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या बारावीच्या परीक्षेत यावर्षी जिल्ह्यातील ८५.५७ टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळविले. त्यात २१० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातील ६ जिल्ह्यात गडचिरोली निकालात पाचव्या स्थायी आहे. आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त भाग असतानाही गडचिरोली जिल्ह्याने हे मिळविले आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.७१ टक्के होता. तो यावर्षी ३ टक्क्यांनी वाढला आहे. गडचिरोली शहरातील प्लॅटिनम ज्युबिली स्कूलचा विद्यार्थी कार्तिकेय शंकरराव कोरंटलावार याने ९२.१५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. देसाईगंज येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा संकेत पुंडलिक बोथे हा ९१.३८ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात द्वितीय आला आहे, तर गडचिरोलीच्या शिवाजी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी पियुष मनोज अलोनी याने ९०.९२ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात तृतीय स्थान पटकावले आहे. जिल्ह्यातून १३ हजार ५९६ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १३ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातून ११ हजार ६२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात सर्वाधिक ६८१५ विद्यार्थी कला शाखेतील, ४२०९ विद्यार्थी विज्ञान, २२६ विद्यार्थी वाणिज्य तर ३७३ विद्यार्थी व्होकेशनल शाखेचे आहेत. विज्ञान शाखेचे सर्वाधिक (९५.०१ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये २१० विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी, २७१७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ७९८७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील ११ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. याशिवाय ९ शाळांमधील एका शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे. कार्तिकेयला करायचेय वडिलांचे स्वप्न पूर्ण ९२.१५ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावणाऱ्या कार्तिकेय शंकर कोरंटलावार याला आयएएस होऊन वडिलांचे अपुरे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्याच्या या यशाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’कडे आपल्या भावना व्यक्त करताना कार्तिकेयन याने या यशाचे गमकही उलगडले. कार्तिकेयचे वडील शंकर कोरंटलावार धानोरा पंचायत समितीत सहायक लेखाधिकारी आहे तर आई विमल नवेगाव येथील जि.प.शाळेत शिक्षिका आहे. आपल्या या यशात आई-वडिलांचे वेळोवेळी मिळालेले पाठबळ, प्लॅटिनम ज्युबिली शाळेचे प्राचार्य आमलानी, उपप्राचार्य मंगर व इतर शिक्षकवृदांचे योग्य मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. ट्युशन असली तरी खरे ज्ञान शाळेतच मिळते असे त्याने सांगितले. वडीलांना आयएएस व्हायचे होते. परंतू त्यावेळच्या त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना आयएएसची तयारी करता आली नाही. मात्र वडिलांचे ते अधुरे स्वप्न आपण पूर्ण करणार, असे कार्तिकेय सांगतो. प्रथम आयआयटीला प्रवेश घेऊन नंतर आयएएसची तयारी करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यासाठी आई-वडिलांनीही त्याला पूर्ण पाठबळ देण्याची तयारी दर्शविली. विशेष म्हणजे दहावीतही कार्तिकेयने ९३.६० टक्के गुण मिळविले होते. शाळेतील शिस्तीचे वातावरण आणि योग्य मार्गदर्शन यामुळे कार्तिकेयला हे यश मिळविता आल्याचे त्याच्या वडीलांनी लोकमतला सांगितले.
बारावीच्या निकालात सुधारणा
By admin | Published: May 31, 2017 2:05 AM