लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून २०२३-२४ मध्ये कोट्यवधी रुपयांची कामे विशिष्ट कंत्राटदारांना खिरापतीप्रमाणे वाटण्यात आली. त्यासाठी ऑफलाइन निविदा प्रक्रियेची पळवाट काढली गेली. ऑफलाइन निविदा प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत ९ जुलै रोजी शासकीय कंत्राटदार संघटनेने कार्यकारी अभियंत्यांना जाब विचारत आंदोलनाचा इशारा दिला.
आलापल्ली येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असून, याअंतर्गत अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या दुर्गम, अतिदुर्गम व नक्षलप्रभावित तालुक्यांत विविध विकासकामे केली जातात. मात्र, २०२३- २४ मध्ये या कार्यालयाने ऑनलाइन प्रक्रियेला फाटा देत ऑफलाइन पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवली. त्यामुळे अनेक कंत्राटदारांना याबाबत माहितीही मिळाली नाही. परिणामी विशिष्ट कंत्राटदारांनीच निविदेत सहभाग घेत आपल्या पदरात कामे पाडून घेतली, असा कंत्राटदार संघटनेचा आरोप आहे. आलापल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बळवंत रामटेके यांना दिलेल्या निवेदनात हा आक्षेप नोंदवला आहे.
सर्व निविदांची माहिती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करावी, सर्व ऑफलाइन निविदांची एक प्रत शासकीय कंत्राटदार संघटना अहेरी आणि आलापल्ली यांना द्यावी, १.५० कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या कामांसाठी शासन निर्णयानुसार अटी व शर्ती न ठेवता सर्व कंत्राटदारांना सहभागी होण्याची संधी द्यावी, आदी मागण्या केल्या आहेत.
या मागण्यांची पूर्तता न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करून उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे. निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे पाठवली आहे. यावेळी सत्यनारायण लक्ष्मण गद्देवार, गद्देवार, प्रशांत पत्तीवार, कौसर खान, रामेश्वर कडूजी, सतीश मुक्कावार, सुमित मुक्कावार, अक्षय चल्लावार, हरीश सिडाम, दानिश शेख, भूषण शेकुर्तीवार, एस. एस. रायपुरे, विनायक सोनुले, निखिल संगीडवार, तिरुपती पत्तीवार, शालिनी निब्रड यांची उपस्थिती होती.
विशिष्ट कंत्राटदारांवरील मेहेरबानीमागचे 'राज' काय?● ऑफलाइन कामे पदरात पाडून घेण्यासाठी पडद्यामागे मोठ्या घडामोडी व उलाढाली झाल्याची शक्यता आहे.● सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याच्या नातेवाइकाने यासाठी वजन वापरून आपल्या बगलबच्च्यांना अधिकाधिक कामे कशी मिळतील यासाठी फिल्डिंग लावल्याचे सूत्रांनी सांगितले.● विशिष्ट कंत्राटदारांवर सार्वजनिक बांधकाम विभाग मेहेरबान असण्यामागचे नेमके 'राज' काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिदुर्गम भागात थातूरमातूर कामे कशी?● भामरागड, सिरोंचा येथे कोट्यवधी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र, या कामांच्या दर्जाबाबत नेहमीच स्थानिकांची ओरड असते.● काही ठिकाणी कामे न करताच निधी हडप केल्याचे प्रकार होत असल्याचा आरोपही नेहमीच होतो.● आता कंत्राटदारांनीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यशैलीवर आक्षेप नोंदविल्याने अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात विकासकामांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांचे प्रशासनात कोणाशी हितसंबंध आहेत, याची चर्चा होऊ लागली आहे.
निविदा प्रक्रिया राबविताना सर्व निर्देशांचे पालन केलेले आहे. याबाबत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात दिली आहे. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नाही.- बळवंत रामटेके, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली