लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : लगतच्या ब्रह्मपुरीवरून १२ जून राेजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास देसाईगंजकडे येत असताना देसाईगंजपासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरबाेडी गावाजवळ ०२ डीजे ७४५६ या क्रमांकाच्या भरधाव कारची झाडाला धडक बसली. या अपघातात देसाईगंज येथील दोन युवक जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सन्नी संजय वाधवानी (२४), शुभम कापगते (२८, दोघेही राहणार देसाईगंज) हे जागीच ठार झाले. तर सुमित मोटवाणी (२७), वसंता हरगोंविद जोशी (२८), सत्या आहुजा(२७, तिघेही राहणार देसाईगंज) हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात एकाचा कमरेपासून पायापर्यंतचा भागच निकामी झाला आहे. तर एकाचे पायच तुटले आहेत. तिसरा वसंता जोशी यांच्या तोंडाला जबर मार लागला आहे. अपघात एवढा भयंकर होता की यात वाहनाचा समोरच्या भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झालेला आहे.
एवढ्या रात्री कुठून येत हाेते?दरम्यान, देसाईगंज येथील अपघातात सापडलेले पाचही जण ब्रम्हपुरीला कशासाठी गेले होते? रात्री उशिरापर्यंत ब्रम्हपुरीवरून भरधाव वेगाने येण्यामागचे कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघातातील आलिशान गाडी कुणाची होती? रात्रभर हे पाचही अपघातग्रस्त पहाटे तीन वाजेपर्यंत कुठे थांबले होते? याची गांभीर्याने सखोल चौकशी केल्यावर अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.