गडचिराेली : जिल्ह्यात चार जातीचे विषारी साप तर दाेन जातीचे निमविषारी साप आढळतात. पावसाळा सुरू हाेताच हे साप बिळातून बाहेर पडतात. सुरक्षित ठिकाण शाेधण्याच्या प्रयत्नात ते मानवी वस्तीकडे येतात. अशावेळी लाेकांना आढळल्यानंतर ते त्यांना जीवे मारतात. परंतु बरेचदा सापांकडूनही लाेकांना दंश हाेताे. जिल्ह्यात जून महिन्यापासून जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ७४ लाेकांना सर्पदंश झाला.
गडचिराेली जिल्ह्यात नाग, घाेणस, मण्यार व फुरसे आदी विषारी प्रजातींचे साप आढळतात. मण्यार प्रजातीत काळा मण्यार व पट्टेरी मण्यार आदी प्रकार आहेत. तर नाग व घाेणस सर्वत्र आढळतात. मात्र फुरसे साप क्वचितच आढळताे. परंतु त्याचा वावर जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग ग्रामीण व दुर्गम भागात विस्तारला असल्याने सर्पदंशानंतर गावठी उपचार तसेच मंत्राेच्चार पद्धतीतून विष उतरविण्याचा प्रयत्न केला जाताे. परंतु दवाखान्यात उपचारासाठी नेले जात नसल्याने रुग्णाचा मृत्यू हाेताे.
सर्पदंशावरील औषधसाठा उपलब्ध
साप चावल्यानंतर रुग्णाला ॲन्टिस्नेक वेनम दिले जाते. ही औषधी प्रत्येक प्राथमिक आराेग्य केंद्रात उपलब्ध असते. शहरी भागात रुग्णालयांमध्येसुद्धा ही औषधी उपलब्ध असून विषारी साप चावल्यानंतरच दिले जाते. विशेष म्हणजे विषारी साप चावल्याची खात्री केली जाते. खात्री झाल्यानंतरच ही औषधी रुग्णाला इंजेक्शनच्या रूपात टाेचली जाते.
विंचूच्या दंशाला काेणीच जुमानेना
पावसाळ्यापूर्वी शेतीची अथवा घराशेजारील विविध कामे करताना विंचूचा दंश हाेताे. परंतु ग्रामीण भागात काेणीच आराेग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी जात नाही. शहरी भागात माेजकेच लाेक विंचवाच्या दंशावर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात जातात.
गडचिराेली जिल्ह्यात चार प्रजातींचे विषारी साप आढळतात. परंतु नाग वगळता मण्यार, घाेणस व फुरसे सापाबाबत लाेकांना माहिती नाही. माेजक्याच लाेकांना या सापांविषयी ज्ञान आहे. त्यामुळे काेणताही साप आढळून आल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना माहिती द्यावी. जैवविविधतेत सापांचे स्थान महत्त्वाचे असल्याने सर्व जिवांना जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सापसुद्धा जगविणे आवश्यक आहे.
- अजय कुकडकर, सर्पमित्र