दिगांबर जवादे
गडचिराेली : मागील १५ दिवसांपासून जिल्ह्यात डाेळ्यांची साथ आहे. या साथीच्या रुग्णांची संख्या वाढताच आता तापाचीही साथ वाढली आहे. विशेषकरून लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे पालक चिंतेत आहेत. रुग्णालयांमधील ओपीडी रुग्णांची संख्या वाढत आहे.
एकाच गावात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना जेव्हा एकच आजार होतो, तेव्हा त्या आजाराला साथीचा आजार म्हणतात. एकेकाळी अशा साथीच्या आजारांना तोंड देताना मृत्युमुखी पडावे लागल्याची अनेक उदाहरणे असत. पण, वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीनंतर अशा साथीच्या रोगांची कारणे समजू लागली आणि त्यावर उपायही होऊ लागले. साथीचे रोग बहुधा त्या भागातील दूषित पाण्यामुळे होतात, डासांमुळे, कुत्र्यांमुळे किंवा उंदरांमुळे पसरतात किंवा आजार झालेला रुग्ण दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास त्याला व इतरांना आजार हाेताे. अशाप्रकारे आजाराचे रुग्ण वाढत जातात.
पावसाळ्यात सतत पाऊस पडत असल्याने सभाेवतालच्या वातावरणात फार माेठे बदल हाेतात. परिसरात अस्वच्छता असल्यास आणखी साथीचे राेग पसरतात. पावसामुळे नद्याचे पाणी दूषित हाेते. काही गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्र नाही. तसेच, पाणी वापरले जाते. काही नागरिक तर हेच पाणी पिण्यासाठीही वापरतात. विशेष म्हणजे या कालावधीत मानवाची राेगप्रतिकारक शक्ती व पचन शक्ती कमी झालेली राहते. परिणामी काेणताही साथराेग बळावतात.
या आजारांचा धोका
गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, कावीळ, विषमज्वर या आजारांचेही प्रमाण वाढलेले असते. या राेगांवर आता प्रभावी उपाय आहेत. वेळीच उपचार घेतल्यास हे राेग बरे हाेतात. मात्र, उपचाराला उशीर झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे.
आराेग्य यंत्रणा अलर्ट
जिल्ह्यात साथीच्या राेगाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे आराेग्य विभागाची यंत्रण अलर्ट झाली आहे. रुग्णांना औषधाेपचार करून त्यांना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
उघड्यावरचे पदार्थ टाळा, हात स्वच्छ धुवा
डाेळे येण्याच्या आजाराची लागण झाली असल्यास दाेन ते तीन दिवस घराच्या बाहेर निघू नये. कुटुंबातील इतर सदस्यांपासूनही दूर राहावे. स्वत:चे कपडे वेगळे ठेवावे. हात वेळाेवेळी सॅनिटाइझ करावे. काेमट पाण्याने डाेळे स्वच्छ धुवावे. शक्यताे शिजलेलेच अन्न घ्यावे. उघड्यावरचे अन्न आणि पाणी टाळावे. पाणी गरम करून प्यावे. जेवण करण्यापूर्वी किंवा काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
डाॅ. रूपेश पेंदाम, जिल्हा साथराेग अधिकारी.