लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : गडचिराेली एसटी आगारातील एसटीच्या वाहकांकडे आवश्यकतेच्या तुलनेत ६० टक्केच तिकीट यंत्रे उपलब्ध आहेत. त्यामुळे दुसरी बस आगारात येऊन हे यंत्र उपलब्ध हाेईपर्यंत वाहकाला प्रतीक्षा करावी लागते. परिणामी बसला विलंब हाेऊन प्रवाशांचा वेळ खर्ची होत आहे.लाेखंडी ट्रेमधून तिकीट काढून त्यावर पंच करून तिकीट देणारा वाहक बहुतांश प्रवाशांना परिचयाचा आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एसटी महामंडळानेही ती जुनी पद्धत बंद करून पाच वर्षांपूर्वी तिकीट काढण्यासाठी ईटीआय हे छोटेखानी यंत्र वाहकांच्या हाती दिले. या यंत्राने वाहकांचे कामकाज बरेच साेपे केले. सातत्याने या मशीनचा वापर करण्यामुळे जुन्या पद्धतीने ट्रेमधील तिकीट देण्याची वाहकांची सवय तुटली. जेवढ्या एसटी बसेस आहेत त्यापेेक्षा जास्त प्रमाणात मशीन उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र गडचिराेली आगारात बसगाड्यांपेक्षा कमी प्रमाणात मशीन उपलब्ध आहेत. गडचिराेली आगारात १०३ बसेस आहेत. त्यासाठी १५० यंत्रांची आवश्यकता आहे, मात्र प्रत्यक्षात केवळ ८० यंत्रे उपलब्ध आहेत. जुन्या वाहकांना ट्रेमधील साधे तिकीट देण्याचे काैशल्य अवगत आहे. नवीन वाहकांना या तिकिटांचा हिशेब समजत नाही. परिणामी ते साधे तिकीट साेबत नेण्यास नकार देतात. दुसऱ्या बसमधील तिकीट यंत्र उपलब्ध होईपर्यंत प्रतीक्षा करतात. ताेपर्यंत बसला उशीर हाेतो. बसच्या वेळेवर प्रवासी स्थानकात पाेहाेचून प्रतीक्षा करत उभे राहतात. पण बस वेळेवर साेडली जात नाही. याचा त्रास प्रवाशांना हाेत आहे. कंटाळून काही प्रवासी बसऐवजी दुसऱ्या खासगी वाहनाचा आधार घेऊन प्रवास करतात.
अनेक यंत्रे नागपूर व मुंबईत पडूनईटीआय यंत्र दुरुस्त करण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने आगारात एक तंत्रज्ञ बसविला आहे. हा तंत्रज्ञ किरकाेळ बिघाड दुरुस्त करतो. मात्र माेठा बिघाड असल्यास यंत्र नागपूर किंवा मुंबई येथे पाठविले जातात. त्याची तक्रारही ऑनलाइन करावी लागते. गडचिराेली आगारातून आतापर्यंत १२२ ऑनलाइन तक्रारी नाेंदविण्यात आल्या आहेत; पण अजून ती यंत्रे दुरुस्त करून परत करण्यात आलेली नाहीत.
तिकीट यंत्र बंद पडण्याचे प्रमाण वाढले डिजिटल तिकीट यंत्रात कधीही बिघाड निर्माण हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंत्र असले तरी तिकिटांचा ट्रे साेबत ठेवावाच लागतो. गडचिराेली आगारात असलेल्या बहुतांश यंत्रांना आता पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी हाेऊन त्यांच्यात बिघाड निर्माण हाेण्याचे प्रमाण वाढले असल्याने वाहक त्रस्त झाले आहेत. मात्र नाेकरी करायची असल्याने हा वैताग त्यांना सहन करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया अनेक वाहकांनी दिली.