चार महिन्यांचा साठा रवाना : रस्तेही तयार करावे लागलेभामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याचा अतिशय दुर्गम भाग असलेल्या बिनागुंडा परिसरातील संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे धान्य पोहोचविण्याच्या कामाला भामरागड तालुका प्रशासनाने प्रारंभ केला आहे. भामरागड तालुक्यातील पावसाळी संपर्क तुटणाऱ्या अतिसंवेदनशील गावांमध्ये नवसंजीवनी योजनेंतर्गत जून ते सप्टेंबर या चार महिन्याकरिता लागणारे धान्य दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या गावांमध्ये पोहोचविले जाते. यावर्षी नवसंजीवन योजनेंतर्गत मिळणारे धान्य पोहोचविण्याचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. १९ मे रोजी बिनागुंडा गावापासून याची सुरुवात करण्यात आली. बिनागुंडा येथील गावकऱ्यांच्या सहभागातून लाहेरी ते बिनागुंडा धान्य वाहतुकीसाठी रस्ता तयार करण्यात आला आणि जून ते सप्टेंबर या चार महिन्यांचे धान्य भामरागड तहसीलचे पुरवठा निरीक्षक ए. टी. भंडारवाड यांच्या उपस्थितीत बिनागुंडा येथे उतरविण्यात आले. यावेळी भंडारवाड यांनी स्वत: सदर गावातील नागरिकांना धान्याचे वितरण केले. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल या गावातील नागरिकांनी प्रशासनाबद्दल आस्था व्यक्त केली. पुढील चार महिने या भागाचा संपर्क तुटलेला राहतो. त्यामुळे यावर्षी प्रशासनाने मे महिन्याच्या मध्यांतच हे काम हाती घेतले आहे. (तालुका प्रतिनिधी)
बिनागुंडा परिसरात धान्य पोहोचविण्यास सुरुवात
By admin | Published: May 21, 2016 1:25 AM