भामरागड : ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील प्रकल्पाने आरोग्य क्षेत्रातील विकासाचा एक नवा टप्पा गाठला आहे. या रूग्णालयाच्या नव्या इमारतीचे आज रविवारी उद्घाटन महारोगी सेवा समिती वरोराचे प्रमुख डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. भामरागडसारच्या मागास भागात सर्वसामान्य आदिवासी जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी २३ डिसेंबर १९७३ मध्ये डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा हा महायज्ञ सुरू केला होता. गेल्या ४१ वर्षापासून आरोग्याचा हा महायज्ञ सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड व आंध्रप्रदेश राज्यातील शेकडो रूग्ण येथे उपचारासाठी येतात. स्वतंत्र इमारतीचे बांधकामही करण्यात आले आहे. या इमारतीचे विधिवत उद्घाटन डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. जोगळेकर, डॉ. हाजरा, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे, डॉ. कन्ना मडावी, सुहास खांडेकर, मनिष संघवी, जितू नाईक विलास मनोहर आदी उपस्थित होते. सुहास खांडेकर, मनिष संघवी यांनी मदत दिली आहे. त्यातून हॉस्पीटलची निर्मिती करण्यात आली. नागपूरच्या अय्यर कंपनीने बांधकाम केले असून कमलाकर साधले, राजेश जोशी या वास्तूविशारदांनी डिझाईन केली. सदर इमारतीचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. बाबा आमटे यांच्या जयंतीला इमारतीचे लोकार्पण होईल. (तालुका प्रतिनिधी)
लोकबिरादरीत नव्या रूग्णालयाचे उदघाटन
By admin | Published: May 18, 2014 11:33 PM