सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नागरिकांना विविध कामांकरिता भटकंती करावी लागू नये, सर्व कामे एकाच ठिकाणी व मोफत पार पडावीत, जनतेचा वेळ व पैसा यांची बचत व्हावी, त्यामुळे नागरिक व पोलिसांमध्ये ऋणानुबंध तयार हाेतील या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनात सावरगाव पाेलीस मदत केंद्रात दादालोरा खिडकी सुरू करण्यात आली. यावेळी ४१ सात-बारा व नमुना आठ, ४० मृत्यू प्रमाणपत्रे, २ अपंग प्रमाणपत्रे,१ रहिवासी दाखला व ४ इतर प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली.
दादालाेरा खिडकीचे उद्घाटन सरपंच राजाराम गोटा व अंगणवाडी सेविका देवकुवर नैताम यांच्याहस्ते पार पडले. यावेळी ग्रामसेवक अनिल नरोटे, तलाठी दीपक मेश्राम, दीप्ती असेंडी, आरोग्य सेविका जे. जे. घोडाम, गावपुजारी रामसाय गावडे आदी उपस्थित हाेते. पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, प्रभारी पोलीस अधिकारी रमेश पाटील, श्यामराव गोरड, श्रीधर वाघमारे यांनी दादालोरा खिडकीचे महत्त्व पटवून दिले. सावरगाव पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील नागरिकांनी दादालोरा खिडकीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.