वैरागड : वातावरणातील बदलामुळे उन्हाळी धान पिकावर खाेडकिडा, करपा या राेगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या राेगांपासून धान पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या फवारण्या करीत आहे. वैरागडसह कुरखेडा तालुक्यातील अनेक शेतकरी उन्हाळी धान पिकाची लागवड करतात. खरीप पिकापेक्षा उन्हाळी धानाचे उत्पादन अधिक हाेते. त्यामुळे शेतकरी इतर पिकांची लागवड करण्यापेक्षा उन्हाळी धान पिकाची लागवड करण्याकडे वळत चालला आहे. त्यामुळे उन्हाळी धान पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शेकडाे हेक्टरवर धानाची लागवड झाली आहे.
महिनाभरापूर्वी राेवणीची कामे पूर्ण झाली आहेत. धान पीक आता हिरवेगार पडायला लागले आहे. मागील १५ दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. तसेच वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे धान पिकावर कडाकरपा व खाेडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आहे. या राेगांचे प्रमाण वाढल्यास धान पिकाचे माेठे नुकसान हाेण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी दर दिवशी धानाचे निरीक्षण करावे. धानावर खाेडकिडीचा प्रादुर्भाव झाला असल्याचे आढळून आल्यास ट्रायकाेग्रामा व करपा राेगाच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक कीटकनाशकांची फवारणी करावी. कृषी केंद्र चालक अत्यंत महागडी कीटकनाशके शेतकऱ्यांना खरेदी करायला लावतात. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कीटकनाशकांची निवड करावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी जी. एन. जाधवर यांनी केले आहे.