उमानूर जवळील घटना : लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली मदत; अहेरी व चंद्रपूरच्या रूग्णालयात जखमींवर उपचार लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी/जिमलगट्टा : उमानूर जवळ ट्रक व ट्रॅक्स यांच्यामध्ये जबर धडक होऊन सहा जण जागीच ठार झाले तर १० जण जखमी झाले आहेत. यातील चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित सहा जण अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत आहेत. अपघातातील तीन मृतक देचलीपेठा येथील रहिवासी असल्याने या गावावर शोककळा पसरली आहे. या अपघातात राजेश लसमय्या कोडापे (३०), तुळशीबाई राजेश कोडापे (२६), सुधाकर वासू सेना (२५) तिघेही रा. देचलीपेठा, गौतीबाई गौरय्या आत्राम (६०), रामबाई विस्तारी सिडाम (५५) दोघीही रा. कर्जेली, माधुरी गोरगुंडा (१५) रा. पातागुडम हे सहा जण जागीच ठार झाले आहेत. निलाबाई आत्राम (४५) रा. मेडपल्ली, बुचका श्यामराव तेलंग (४०), किटक्का येंकय्या पोरतेट (४३), गोसाई बोकी पोरतेट (४८), तिघेही रा. देचलीपेठा हे चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चौघांना दुपारी २ चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले. श्रेया कुकुमय्या आत्राम (१०) रा. मेडपल्ली, लक्ष्मीनारायण श्यामराव तेलम (१२), मैना श्यामराव तेलम (१८), लालू वैकंय्या तेलम (४६), श्रेया श्यामराव तेलम (११), महालक्ष्मी राजू कोडापे (२) सर्व रा. देचलीपेठा हे किरकोळ जखमी झाले आहेत. यातील काहींना सुटी देण्यात आली आहे. तर काहींवर अहेरी उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे. अपघात झाल्याची माहिती कळताच उमानूर येथील नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. उमानूर हे गाव देचलीपेठापासून ३० किमी अंतरावर आहे. फोनवरून अपघाताची माहिती देचलीपेठा येथे देण्यात आल्यानंतर तेथीलही नागरिकांनी वाहनांच्या मदतीने घटनास्थळ गाठले. जिमलगट्टा-देचलीपेठा जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य ऋषी पोरतेट यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना अहेरी रूग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. रविवारी सायंकाळपर्यंत ते रूग्णालयातच तळ ठोकून होते. अपघाताची माहिती कळताच जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पांढरे हे १०२ क्रमांकाची रूग्णवाहिका तर डॉ. त्रिवेंद्र खटरे यांनी १०८ क्रमांकाची घेऊन घटनास्थळावर दाखल झाले. रूग्णांना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले. उपजिल्हा रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, डॉ. संजय उमाटे, डॉ. आर. एल. हकीम, डॉ. दीपक मुंडे यांनी उपचार केले. धडक दिलेला ट्रक गंजलेले तार घेऊन जात होता. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळाहून पळ काढला. अपघातातून बचावलेली महालक्ष्मी झाली पोरकी या भिषण अपघातात दोन वर्षाची चिमुकली महालक्ष्मी राजेश कोडापे हिला मात्र सुदैवाने काहीही झालेले नाही. या अपघातातून ती बचावल्याने तिला नशीबवानच म्हणावे लागेल. मात्र या अपघाताने तिचे आई, वडील हिरावून घेतले आहेत. महालक्ष्मीचे वडील राजेश कोडापे व आई तुळशीबाई राजेश कोडापे हे दोघेही मृत्यूमुखी पडले. विशेष म्हणजे, राजेशच्या बहिणीचे ४ मे रोजी लग्न आटोपले होते. तिलाच परत आणण्यासाठी दोन ट्रॅक्स घेऊन नातेवाईक तेलंगणात गेले होते. सुदैवाने ज्या ट्रॅक्समध्ये नवविवाहित जोडपे होते. त्या ट्रॅक्सला अपघात झाला नाही. अपघातात ठार झालेले व जखमी झालेले बहुतांश नागरिक देचलीपेठा येथील असल्याने या गावावर शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन दुपारपर्यंत आटोपल्यानंतर सायंकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.
अपघाताच्या घटनेने देचलीपेठा गावावर पसरली शोककळा
By admin | Published: May 08, 2017 1:25 AM