कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे

By संजय तिपाले | Published: July 8, 2023 04:36 PM2023-07-08T16:36:20+5:302023-07-08T16:37:10+5:30

गडचिरोलीत शासन आपल्या दारी: सामान्यांच्या विकासासाठी भाजप- शिवसेनेला साथ - अजित पवार

Incidents like Ajit Pawar happen when there is injustice done to accomplished persons - Eknath Shinde | कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे

कर्तृत्ववान व्यक्तींवर अन्याय होतो तेव्हा अजित पवारांसारख्या घटना घडतात - एकनाथ शिंदे

googlenewsNext

गडचिरोली : राज्याला विकासाकडे घेऊन जाणारे सुशासन भाजप- शिवसेना सरकारने आणले. आता अजित पवार यांचीही साथ लाभली आहे. कर्तृत्ववान व्यक्तीवर अन्याय होतो तेव्हा राजकारणात अजित पवार यांच्यासारख्या घटना घडतात. मी देखील त्यातून गेलो आहे, ही लढाई आपण जिंकू, अजित पवार बोलत रहा, वस्तूस्थिती लोकांसमोर येऊ द्या.. अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्या बंडावर भाष्य केले.

येथील एमआयडीसी मैदानावर ८ जुलै रोजी शासन आपल्या दारी अभियानांतर्गत विविध योजनांचा लाभ सामान्यांना देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री  व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, आमदार सुधाकर आडबले, पद्मश्री डॉ.परशुराम खुणे, जिल्हाधिकारी संजय मीणा, उप महानिरीक्षक संदीप पाटील, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ.सचिन मडावी, भाजप जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि.प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम आदींची उपस्थिती हाेती. यावेळी विविध योजनांचा लाभ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीवर सर्वांचे विशेष लक्ष असल्याचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले, भाजप- शिवसेना सरकारच्या युतीला वर्षपूर्ती झाली. आता अजित पवार सोबत आले आहेत. त्यामुळे डबल इंजिन सरकार आता ट्रिपल इंजिन झाले असून आता ते आणखी वेगाने धावेल. वर्षभरात सरकारने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. सर्वसामान्यांचं हे सरकार असून कुठलाही वैयक्तिक अजेंडा न घेता लोकहिताचे निर्णय घेतले. गडचिरोलीत ११ लाखांपैकी सात लाख लोकांना विविध प्रमाणपत्रे, योजनांचा लाभ घरपोहोच देण्याचे काम केले. या माध्यमातून ६०१ कोटींच्या योजना सामान्यांना दिल्या आहेत. दुर्गम भागातील  लोक विकासाच्या मुख्य प्रवाहात येत असल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

शंकर भोळा आहे, पण त्याला तिसरा डोळा आहे : फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज शासन आपल्या दारी योजनेतून दिलेल्या लाभानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान ही सरकारच्या कामाची पावती आहे. विकासाच्या मुद्द्यावर भाजप व शिवसेना एकत्रित आली, आता अजित पवार सोबत आहेत. यानिमित्ताने त्रिशूल तयार झाले आहे. विकासासाठी या त्रिशुलाचा उपयोग होईल, पण सामान्यांच्या विरोधात कोणी काम करत असेल तर त्याला सोडणार नाहीत. शंकर भोळा आहे, पण त्याला तिसरा डोळा आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला. कोनसरी येथे २० हजार कोटींची गुंतवणूक करुन नवा प्रकल्प   उभारत आहे. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल. मात्र,   लोहखनिजावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया झाली पाहिजे. विमानतळासाठी १४६ हेक्टर जागेची पाहणी केली आहे. दुर्गम भागात ५४४ मोबाइल टॉवर उभारले आहेत. ३१ हजार कुटुंबांना घरकुल दिले आहेत. आगामी काळात एकही आदिवासी कुटुंब बेघर नसेल, या दृष्टीने प्रयत्न केले जातील,असे त्यांनी सांगितले. 

त्यांना महत्त्व देऊ नका: अजित पवार

केंद्र रकार व राज्य सरकार एका विचाराचे असेल तर निधी व विविध विकास योजना आणता येतात. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षांत देशात मोठ्या प्रमाणात कामे झाली. देश विकासात पुढे जात आहे, या विकासाला पाठिंबा द्यायला हवा म्हणून आपण भाजप व शिवसेनेसोबत आलो आहोत, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राज्याच्या व सामान्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचा उल्लेखही त्यांनी केला. 

याबद्दल कोणी काही म्हणत असेल तर महत्त्व देऊ नका, असेही अजित पवार म्हणाले. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांसोबत रहावे, अंतर पडू देऊ नका, एकीने कामे करा, असा सल्लाही त्यांनी दिला.  

Web Title: Incidents like Ajit Pawar happen when there is injustice done to accomplished persons - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.