गडचिराेली : वर्ल्ड फूड प्राेग्रामअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांना किमान २७० रुपये प्रतिक्विंटल कमिशन देण्यात यावे, तसेच या दुकानदारांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गडचिराेली जिल्हा प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन अन्न नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विलास पाटील यांना देण्यात आले आहे.
सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना विमा संरक्षण देण्यात यावे. दुकानदारांच्या थम्बला अधिप्रमाणित करून काेराेनाकाळात धान्य वितरण करू द्यावे. प्रतिक्विंटल एक ते दीड किलाे धान्याची घट हाेते. ही घट ग्राह्य धरण्यात यावी. शासकीय धान्य गाेदामातून दुकानदारांना ५० किलाे ५८० ग्रॅम वजनाचे काटे देण्यात यावेत. सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या शासन निर्णयाअंतर्गत धान्याचे वितरण करावे. शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या दाेषींवर कारवाई करावी. दुकानदारांना नगर पालिका, महानगर पालिका, ग्रामपंचायतस्तरावरून दुकानभाडे, वीज बिल, स्टेशनरी चाॅर्जेस देण्यात यावे. बिघडलेल्या ई-पाॅस मशीन बदलून नवीन फाेर-जी कनेक्शनच्या ई-पाॅस उपलब्ध करून द्याव्यात. सहा तालुक्यांत हमालीची रक्कम दुकानदारांकडून घेतली जात आहे. या मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हा सचिव अनिल भांडेकर, के. एस. भाेयर, एम. ए. राभिलवार आदी उपस्थित हाेते.