अपर्णा रामतीर्थकर यांचे आवाहन : चामोर्शीत सखी मंचतर्फे ‘चला... नाती जपू या!’ व्याख्यान कार्यक्रम चामोर्शी : बदलत्या काळानुसार समाजव्यवस्थाही बदलत आहे. यात नातेसंबंधही अपवाद नाही. बदलत्या काळानुसार नातेसंबंधांमध्ये दुरावा निर्माण होऊन कुटुंबात प्रसंगी नैराश्य पसरते. त्यामुळे दुरावत चाललेले नातेसंबंध वृद्धिंगत करावे, असे आवाहन सोलापूर येथील ज्येष्ठ समाजसेविका अॅड. अर्पणा रामतीर्थकर यांनी चामोर्शी येथे शुक्रवारी आयोजित ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान कार्यक्रमात केले. लोकमत सखी मंच चामोर्शी युनिक ग्रुपच्या वतीने ‘चला... नाती जपूया!’ व्याख्यान कार्यक्रमाच आयोजन स्थानिक केवळरामजी हरडे शिक्षण महाविद्यालयात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा. मारोतराव कोवासे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा. हिराजी बनपुरकर, मनोज पालारपवार, तालुका संयोजिका चैताली चांदेकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन राजश्री मुस्तीलवार तर आभार युनिक ग्रुप प्रमुख प्रेमा आर्इंचवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी आरती भिमनवार, प्रीती भोगावार, स्वाती जिल्हेवार, प्राची भिवापुरे, रूपा दोशी, कांचन चकोर, सोनाली पालारपवार, संगीता करिंगलवार, लीला आर्इंचवार, तारा गांधी, रोशनी वरघंटे, ज्योती ओल्लालवार, मुमताज सय्यद, काजल सोमनकर, श्वेता पालारपवार व सखी सदस्यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी) व्याख्यानातील कौंटुबिक मार्गदर्शन कुटुंबातील सासू-सून, नणंद-भावजय, जावा-जावा, जावई-सासरे, माय-लेक यांच्या नातेसंबंधात अनेकदा दुफळी निर्माण होऊन नातेसंबंध बिघडत असतात. त्यामुळे या सर्व नात्यांमध्ये उत्कृष्ट प्रेमसंबंध निर्माण करून ते कायम ठेवणे गरजेचे आहे. आई-वडिलांनी मुला-मुलींवर सुसंस्कार करावे. धावपळीच्या जीवनातही पती-पत्नीने एक-दुसऱ्यांशी प्रेमपूर्वक वागावे, तेव्हाच कुटुंबात शांतता असते व सदस्यांमध्येही सौहार्दपूर्ण वातावरण असते. महिलांनी चूल व मूल सांभाळतांनाच संयुक्त कुटुंब पद्धती टिकवून ठेवता येईल, याकरिता प्रयत्न करावेत. समन्वय ठेवून कौंटुबिक समस्यांवर विचारमंथन करावे, असे मार्गदर्शन अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी केले.
दुरावत चाललेले नातेसंबंध वृद्धिंगत करा
By admin | Published: July 17, 2016 1:10 AM