सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधा
कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी-सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अरततोंडी ते सती नदीघाट हे अंतर जवळपास दोन कि.मी. आहे.
चतुर्थ श्रेणी दर्जापासून कोतवाल वंचित
आष्टी : गावात दवंडी देणे, मृतदेहाची विल्हेवाट लावणे, शेतसारा जमा करणे, अशी विविध कामे करणाऱ्या जिल्हाभरातील सज्जांतर्गत कोतवालांना महिन्याकाठी अल्प मानधन दिले जात आहे. वारंवार मागणी करूनही कोतवालांना चतुर्थ श्रेणी दर्जा देऊन त्यांना नियमित वेतन देण्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे.
देवलमरीत सिमेंट प्रकल्प उभारा
अहेरी : तालुका मुख्यालयापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या देवलमरी, कारेपल्लीत सिमेंट निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेला दगड आहे. त्यामुळे देवलमरी परिसरात सिमेंट उद्योग उभारण्याची मागणी होत आहे.
प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा द्या
आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करत आहे; परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला नाही.
जिल्हाभरातील अनेक हातपंप नादुरूस्त
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यासह जिल्हाभरातील अनेक गावांमधील शेकडो हातपंप मागील सहा महिन्यांपासून बंद आहेत. सदर हातपंप दुरूस्त करण्यात यावे, यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, याकडे पंचायत समितीचे दुर्लक्ष झाले आहे.
कोरची तालुक्यातील रस्ते दुरूस्त करा
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगविले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत आल्या आहेत तरीही याच इमारतींमधून प्रशासकीय कारभार चालविला जात आहे. मात्र, अद्यापही नवीन इमारत बांधण्यात आलेल्या नाहीत.
नगरपंचायतींना स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : नगरपंचायत स्थापन होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, शासनाने नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे जुन्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयातूनच शहरांचा कारभार चालवावा लागत आहे. अपुऱ्या जागेमुळे दस्तावेज ठेवण्याची अडचण वाढली आहे.
शहरातील नाल्यांची दुरूस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.
अंतर्गत रस्ते दुरूस्त करण्याची मागणी
आरमोरी: शहरातील अंतर्गत रस्त्यांची फार मोठी दुर्दशा झाली आहे. वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे. रस्त्यांची दुरूस्ती करण्याबाबत ग्रामपंचायतीकडे स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा निवेदन देऊन मागणी केली आहे. मात्र, अजूनपर्यंत रस्ते दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.
पशुपालनाच्या योजनांची जनजागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या
धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले; परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकºयांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.
शहरातील पक्के अतिक्रमण कायमच
आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, या चारही मार्गावर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात आहे.
जिल्ह्यात रिक्त पदांचा अनुशेष कायमच
गडचिरोली : जिल्ह्यातील अनेक विभागांत रिक्त पदे असल्यामुळे नागरिकांचे काम वेळेवर होत नाही. एकाच कामासाठी १५-१५ दिवस शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांमध्ये शासनाप्रती तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.