कुरखेडा : तालुक्यातील चांदागड-डोंगरगाव मार्गावर कमी उंचीचा पूल आहे. या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेकदा मार्गावरील वाहतूक ठप्प होते. परिसरातील जवळपास दहा गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे या ठिकाणी नवीन उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्हा मुख्यालयी जाण्यासाठी अंतर जवळ असल्याने दिवसभर मोठ्या प्रमाणात या मार्गावरून आवागमन असते. दुचाकी, चारचाकी वाहनांची येथून वर्दळ असते; परंतु पावसाळ्यात पूर आल्यानंतर सदर मार्गावरील वाहतूक ठप्प होते. उराडी, मोहगाव, डोंगरगाव, वासी, कोसी आदी गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो. या मार्गावरून शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात तालुका मुख्यालय ते ग्रामीण भागात आवागमन करतात. त्याचप्रमाणे उच्च शिक्षणासाठी विद्यार्थीसुद्धा ये-जा करतात. या भागातील अनेक नाल्यांवर उंच पुलाची अनेक वर्षांपासून प्रतीक्षा आहे; परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गावर नवीन उंच पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.