गडचिरोली : राजीव गांधी सायन्स अॅन्ड टेक्नालॉजी कमिशन अंतर्गत गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात सायन्स अॅन्ड टेक्नालॉजी रिसोर्स सेंटरची स्थापना करण्यात आली असून या केंद्रांतर्गत पाच वर्षाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वनोपजावर प्रक्रिया करून त्याचे बाजारमूल्य वाढविण्यात येणार असल्याची माहिती सायन्स अॅन्ड टेक्नालॉजी रिसोर्स सेंटरचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी यांनी आज शुक्रवारला आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माहिती देताना डॉ. मायी म्हणाले, सायन्स अॅन्ड टेक्नालॉजी रिसोर्स सेंटरच्या कार्यकारीणीची पहिली सभा आज २१ नोव्हेंबरला गोंडवाना विद्यापीठात पार पडली. या सभेला केंद्राचे १३ सदस्य उपस्थित होते. या सभेत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वनोपज तसेच उत्पादकावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याचे ठरविण्यात आले. या संदर्भात पाच वर्षाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून शासनाने याकरीता १८ कोटी रूपयाचा निधी मंजूर केला आहे. सभेमध्ये उत्पादनाची बाजारमुल्य वाढविणे, मार्केटींग, रिसर्च, कार्यकारीणीचा पाठींबा, प्रकल्पात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे तसेच या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी बाबी निश्चित करण्यात आल्या असून या केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलणार असल्याचा आशावाद डॉ. मायी यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रपरिषदेला डॉ. प्रकाश डोळस, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दीक्षित उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
उत्पादनाचे बाजारमूल्य वाढविणार
By admin | Published: November 22, 2014 1:13 AM