वनराई बंधाऱ्यांची निर्मिती : महात्मा गांधी शाळा, देसाईगंज व किसान विद्यालय, कोरेगावचा पुढाकारदेसाईगंज/ कोरेगाव (चोप) : जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना गावालगत असणाऱ्या नदी, ओढा, नाल्यावर वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशानुसार जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा वनराई बंधाऱ्याच्या निर्मितीसाठी भिडल्या असून अनेक ठिकाणी वनराई बंधारे बांधून पाणी अडविले जात आहे. त्यामुळे जलस्तर वाढण्यास मदत होत आहे. देसाईगंज येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या हरितसेना विभागाच्या वतीने शनिवारी गाढवी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी सिमेंटच्या रिकाम्या बॅगमध्ये रेती भरून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली. या बंधाऱ्यामुळे लगतच्या शेतांना तसेच गुराढोरांना पाण्याची सोय होणार आहे. सदर उपक्रम प्राचार्य टाकरखेडे, उपप्राचार्य उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका ए. एस. करडे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. यशस्वीतेसाठी हरितसेना प्रमुख बुद्धे, डांगे, ठवकर, तुंडुलवार, मारूडवार व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कोरेगाव येथील किसान विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय व ग्राम पंचायत कोरेगाव, मित्रांगण सार्वजनिक बहुउद्देशीय गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गाढवी नदीघाटावर वनराई बंधारा बांधण्यात आला. प्राचार्य व्ही. एस. मुंगमोडे यांनी वनराई बंधाऱ्यामुळे होणारा पाण्याचा वापर वापर व महत्त्व पटवून दिले. यावेळी सरपंच ममिता आळे, उपसरपंच जगदीश सहारे, राऊत, भावे, अरूण राजगिरे, सुधाकर दोनाडकर, जगदीश केळझरकर, जयंत मेश्राम, महानंदा राऊत, सुमित्रा कन्नाके, लता कन्नाके, सुरेश पर्वतकर, संजय वाघाडे, नरेश नेवारे, रमेश मेश्राम, पुरूषोत्तम भरणे व नागरिक हजर होते. (वार्ताहर)
जलस्तर वाढविण्यासाठी शाळांची लगबग
By admin | Published: December 26, 2015 1:35 AM