कमलापुरात मूलभूत समस्याच भारी
कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
कायमस्वरूपी मुत्रीघरांची व्यवस्था करा
गडचिरोली : पालिकेच्या वतीने शहरात लावण्यात आलेल्या फायबर मूत्रीघरांची अवस्था अल्पावधित बकाल झाली. त्यामुळे शहराबाहेरील व शहरातील नागरिकांची कुचंबना होत आहे. त्यामुळे पालिकेने शहरात मूत्रीघरांची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
पार्कींग जागांवर अतिक्रमण कायमच
गडचिरोली : गडचिरोली नगरपालिकेने शहराच्या काही प्रमुख मार्गांवर दुचाकी वाहनांसाठी पार्कींग व्यवस्था निर्माण केली व तसे फलकही लावलेत. परंतु या जागांवर हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे.
वैरागडमध्ये वाहने रस्त्यावर
वैरागड : गावातील मुख्य रस्त्यावर जड वाहने तासनतास उभी करून मालाची चढउतार केली जाते. जड वाहनांसाठी पार्कींगची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. मात्र याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
अनेक गावांसाठी लाईनमनच नाही
कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांत सुरळीत विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. त्यामुळे लाईनमनची मागणी आहे.
बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित
धानोरा : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायस्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रामंचायत प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. शासनाने योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
पं.स. परिसरातील प्रसाधनगृहांची दुरवस्था
गडचिरोली : स्थानिक पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरात असलेल्या प्रसाधनगृहात प्रचंड घाण साचली आहे. भिंतीलाही विद्रुप स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र स्वच्छतेकडे पं.स. प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पंचायत समितीत ग्रामीण भागातील अनेक नागरिक कामानिमित्त येतात.
जिमलगट्टात मोकाट जनावरांचा हैदोस
जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडून राहते, त्यामुळे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शेणात पाय पडून अनेकवेळा कपडे खराब होत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
वन जमिनीवर अतिक्रमण; जंगल धोक्यात
आलापल्ली : जिल्ह्याच्या पाचही वन विभागात अनेक नागरिकांनी वन जमिनीवर मिळेल त्या ठिकाणी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. गरज नसतानाही लोक अतिक्रमण करीत आहेत. परिणामी जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी होण्याचा धोका आहे.
कोटगूल येथे आयटीआयची मागणी
कोरची : कोटगूल येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंजूर करून या भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षणाची सुविधा निर्माण करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोटगूल परिसरात चार माध्यमिक व दोन उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. गडचिरोली येथे आयटीआय आहे. मात्र ही आयटीआय संस्था कोटगल परिसरातील विद्यार्थ्यांसाठी दूर पडते.