गडचिराेली : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
देसाईगंज : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावांत विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच देसाईगंज तालुक्यातील अनेक विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युतपुरवठा खंडित होतो. कृषिपंपधारक शेतकरी रब्बी पिकाची तयारी करीत आहेत. अशावेळी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. याकडे महावितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित
आरमाेरी : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे कठीण झाले आहे.
गडचिराेलीतील नागरिकांना घरपट्टी मिळण्यास विलंब
गडचिरोली : शहरात गोकुलनगर, रामनगर, इंदिरानगर, विवेकानंदनगर, विसापूर हेटी या परिसरात अतिक्रमण करून हजारो कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र, अद्याप जागेची पट्टी देण्यात आलेली नाही. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा पाहिजे.
शौचालय, स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्याजवळ भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणासाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व स्वच्छतागृहे उभारण्यात यावी, अशी मागणी लखमापूर बोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वसा येथील प्रवासी निवारागृह जीर्ण
गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंतरराज्यीय मार्गावर पूल उंच करा
गडचिरोली : चंद्रपूर - गडचिरोली - धानोरा - राजनांदगाव या आंतरराज्यीय महामार्गावर येणाऱ्या चातगाव ते कारवाफा या मार्गावरील ठेंगण्या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. आंतरराज्यीय महामार्गावरून अनेक लोक कारवाफामार्गे पाखांजूर, छत्तीसगडकडे जातात. पावसाळ्यात ठेंगण्या पुलामुळे हा मार्ग बंद राहतो.
जिल्ह्यात अपुरी अग्निशमन व्यवस्था
एटापल्ली : दहा लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात बारा तालुक्यांमध्ये १६४८ गावे आहेत. घटनांच्या वेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहन जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
जनावरांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लॅस्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत.
पर्यटनस्थळांच्या विकासाकडे दुर्लक्ष
सिरोंचा : तालुक्यातील सोमनूर संगमाच्या विकासाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सोमनूर घाटावर गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असून, हजारो भाविक उपस्थित राहतात. सोमनूरचा विकास करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
विमा नसलेली वाहने धावतात रस्त्यावर
आष्टी : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र, वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत. त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
गॅस सिलिंडर योजनेचा बट्ट्याबोळ
आरमोरी : वनविभागामार्फत नागरिकांना तसेच वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांना अनुदानावर गॅस सिलिंडर कनेक्शन देण्यात आले आहे. मात्र, संपल्यानंतर सिलिंडर भरण्यासाठी लांब अंतराच्या गावांकडे जावे लागते. गॅस सिलिंडर रिफिलिंगचे ठिकाणाचे योग्य नियोजन नसल्याने या योजनेचा बट्ट्याबोळ उडाला आहे.
खरपुंडी मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी
गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीजतारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी होत आहे.
सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा
आष्टी : वीज वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
मार्गावरील खांबामुळे रहदारीस अडथळा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
भामरागड तालुक्यातील गावांना विजेची प्रतीक्षा
भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्यातील अनेक गावांत विजेचे खांब उभे करण्यात आले. त्यावर ताराही ओढण्यात आल्या. मात्र, यावर वीजपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिक अद्याप विजेच्या प्रतीक्षेत आहेत.