खासगी वाहनांचे अतिक्रमण वाढले
कुरखेडा : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली तरी कुरखेडा येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणामुळे शहरामध्ये वाहतुकीची कोंडी आहे.
टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव
धानोरा : विद्युतपुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत, मात्र या टोल फ्री क्रमांकाबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे या क्रमांकावर संपर्क साधू शकत नाही. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.
कोरची तालुक्यातील अनेक शाळा विजेविना
कोरची : शाळांनी डिजिटल साधने खरेदी केले आहेत. मात्र शाळेमध्ये वीजपुरवठा नसल्याने सदर साहित्य धूळ खात पडून आहे. काही शाळांनी वर्गणी गोळा करून वीजजोडणी घेतली. मात्र बिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. या शाळासुद्धा विजेविनाच आहेत.
कुरखेडातील नळजोडणीची तपासणी करा
कुरखेडा : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये घरगुती नळांना मोटरपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळजोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.
भिवापूर-आमगाव मार्गाची दुर्दशा
चामोर्शी : तालुक्यातील भिवापूर क्रॉसिंग-आमगाव (महल)-नेताजीनगर हा १५ किमीचा रस्ता पूर्णपणे उखडला आहे. डांबर निघून मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना या रस्त्यावरून वाहने चालविणे कठीण होत असल्याने सदर मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गोगाव बसथांब्यावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी मार्गावर भरधाव वाहतूक होत असल्याने गोगाव येथील बसथांब्यावर गतिरोधक निर्माण करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. गतिरोधकाअभावी या ठिकाणी अनेकदा अपघात घडले आहेत.
कलादालनातील दुकान गाळे रिकामेच
गडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून पोटेगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनाच्या परिसरात व्यवसायासाठी दुकान गाळे बांधण्यात आले आहेत. मात्र तीन दुकान गाळे वगळता इतर सात ते आठ दुकान गाळे चढत्या दरामुळे रिकामे आहेत. प्रशासनाने भाडे कमी करून ते वापरास द्यावेत, अशी मागणी आहे.
आष्टी येथे पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव
आष्टी : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. नगर परिषदेने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी आहे.
प्रसाधनगृह निर्माण करण्याकडे दुर्लक्ष
गडचिरोली : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात जिल्हाभरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गडचिरोली शहरात व कॉम्प्लेक्स परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. मात्र बसथांबा असलेल्या चामोर्शी, धानोरा, चंद्रपूर, आरमोरी मार्गांवर प्रसाधनगृह नाही. त्यामुळे महिला व पुरुषांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पालिका प्रशासनाने या ठिकाणी प्रसाधनगृह उभारावे, अशी मागणी होत आहे.
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने अपंग युवक-युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते, मात्र या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाड्या लावून विविध साहित्य विक्री करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. मात्र पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
वाहने ठेवणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील चारही मुख्य महामार्गांच्या बाजूला ट्रक व इतर वाहने उभी केली जातात. जागा नसतानाही अनेकांनी वाहने खरेदी केली आहेत. रात्रंदिवस रस्त्यावर वाहने राहत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे सदर वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कुपोषित भागामध्ये परसबाग योजना राबवा
गडचिरोली : जिल्ह्यामध्ये कुपोषणाचे प्रमाण अत्याधिक असल्याने शासनाने त्यावर भाजीपाला व फळरोपांचा उपाय शोधला आहे. आदिवासी कुटुंबांना परसबागेत फळझाड व भाजीपाला लागवडीसाठी प्रोत्साहन देणारी योजना राबविण्याची मागणी आहे.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सुटीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्या, अशी मागणी होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर तसेच अंतर्गत मार्गांवर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात, मात्र नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी अपघात होण्याची शक्यता आहे. खड्डे खोदणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शहरात अनेक ठिकाणी अशा प्रकारे खड्डे खोदले आहेत.
शाळेच्या आवारातील विद्युततारा हटवा
मुलचेरा : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांच्या इमारतींवरून गेलेल्या विद्युततारांमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. या विद्युततारा काढण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये याकरिता तारा हटवाव्यात, अशी मागणी पालकांनी अनेकदा केली आहे. मात्र याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या
धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले, परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषिपंप अजूनही विजेच्या प्रतीक्षेत
कोरची : शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विजेवर चालणारे मोटरपंप देण्यात आले. शेतकऱ्यांनी वीजजोडणीसाठी डिमांडची रक्कम भरली. मात्र दोन वर्षांचा कालावधी उलटूनही वीजजोडणी मिळाली नाही. ग्रामीण भागातील शेतकरी कार्यालयाच्या येरझारा मारत आहेत.