आलापल्लीतील स्थिती : वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचेआलापल्ली : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहनांना उभे ठेवून प्रवासी भरण्यास बंदी असली तरी आलापल्ली येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. खासगी वाहनांच्या वाढत्या अतिक्रमणामुळे आलापल्लीमध्ये वाहतुकीची कोंडी वाढली आहे. आलापल्ली हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. आलापल्ली येथून अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, गडचिरोली येथे जाता येते. त्यामुळे आलापल्ली बसथांब्यावर दिवसाकाठी ५० पेक्षा अधिक बसेस थांबतात. एसटी प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. या बसथांब्यावरच बस थांबणे गरजेचे आहे. मात्र या बसथांब्यासमोर अगोदरच खासगी वाहने उभी करून ठेवली जातात व प्रवाशांची उचल केली जाते. त्यामुळे एसटी थांबविण्यासाठी जागाच राहत नाही. त्यामुळे एसटी बसथांब्यापासून काही दूर अंतरावर नेऊन थांबवावी लागते. प्रवाशी मात्र बसथांब्यावरच वाट बघत राहतात. कधीकधी बससाठी पायपीट करावी लागते. तर कधी प्रवासी नसल्याचे समजून बस सोडण्यात येते. रविवारी आलापल्लीचा बाजार भरतो. या बाजाराच्या दिवशी ग्रामीण हजारो नागरिक आलापल्ली येथे येतात. त्या दिवशी वाहतुकीची कोंडी आणखीच वाढते. वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अहेरी व आलापल्ली शहरासाठी केवळ दोनच वाहतूक पोलीस नेमण्यात आले आहेत. वाहतुकीवर नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
खासगी वाहनांचे अतिक्रमण वाढले
By admin | Published: May 09, 2016 1:34 AM