लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गाव बोड्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत मागील दोन वर्षात सुमारे २४१ बोड्यांची दुरूस्ती झाली आहे. यावर ३४ लाख ७५ हजार रूपयांचा खर्च झाला आहे.धान पिकाला अगदी रोवण्यापासून ते कापणीपर्यंत पाणी उपलब्ध करावे लागते. मात्र जिल्ह्यात कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे सिंचनाचा भार मामा तलाव, बोड्या यांना सांभाळावे लागते. बहुतांश बोड्या या इंग्रज काळातील आहेत. काळाच्या ओघात बोड्यांमध्ये गाळ जमा झाल्याने बोड्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली. त्याचबरोबर पार फुटल्याने काही बोड्यांमध्ये पाणी साचूनही राहत नव्हते. त्यामुळे बोड्या दुरूस्त करणे आवश्यक होते.शासनाकडून मामा तलाव दुरूस्तीसाठी निधी दिला जात होता. मात्र बोड्यांच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात होते. परिणामी बोड्यांवर अवलंबून असलेले धानाचे क्षेत्र धोक्यात आले होते. शासनाने २०१६-१७ या वर्षात बोड्यांची दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ४४० बोड्यांच्या दुरूस्तीचे लक्षांक देण्यात आले होते. यासाठी २०१६-१७ या वर्षात अर्ज मागविण्यात आले होते. सुमारे २०२८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ४३२ बोड्या बांधकामास मंजुरी देण्यात आली. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत २४१ बोड्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ९९ बोड्यांचे अनुदान सुध्दा वितरित करण्यात आले आहे.गडचिरोली जिल्ह्यात मामा तलावांसोबतच बोड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. विशेष करून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा या तालुक्यांमध्ये शेती केवळ बोडीच्या पाण्यावर अवलंबून आहे. एका बोडीच्या माध्यमातून जवळपास ५० ते २०० हेक्टर जमिनीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे सिंचन उपलब्ध करून देण्यात बोड्यांना विशेष महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन बोड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ मामा तलावांची दुरूस्ती केली जात होती. विद्यमान शासनाने मात्र तलावांसोबतच बोड्यांचीही दुरूस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सदर उपक्रम पुढे चालू ठेवत जिल्हाभरातील सर्वच बोड्यांची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. बोडी आटल्यानंतर त्या ठिकाणी रबी पिकांची पेरणी केली जाते. बोडीतील गाळात रबी पीक चांगले येत असल्याने काही शेतकरी पिकांची लागवड करण्यासाठी बोड्या भाड्याने घेत असल्याचेही दिसून येते.मत्स्य व्यवसायास मिळाली चालनाबोडीच्या पाण्याचा उपयोग मुख्यत: धान शेतीसाठी केला जातो. मात्र काही शेतकऱ्यानी बोड्यांमध्ये मत्स्य शेती सुध्दा करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे नागरिकांना दुहेरी रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष करून मुलचेरा, चामोर्शी तालुक्यांमधील बोड्यांमध्ये शेतकरी मत्स्य व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.
बोड्यांमुळे वाढले सिंचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:17 PM
धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गाव बोड्यांची दुरूस्ती करण्यासाठी शासनाने विशेष कार्यक्रम आखला आहे. या अंतर्गत मागील दोन वर्षात सुमारे २४१ बोड्यांची दुरूस्ती झाली आहे. यावर ३४ लाख ७५ हजार रूपयांचा खर्च झाला आहे.
ठळक मुद्दे२४१ बोड्यांची दुरुस्ती : दोन वर्षात ३४ लाखांचा निधी खर्च