डास व कीटकांमुळे आरोग्य धोक्यात
एटापल्ली : शहरातील बहुतांश वाॅर्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपनस्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती होत आहे. आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने फवारणी करून डास व किटकांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
मोहझरीतील रस्त्यांवर खड्डेच खड्डे
गडचिरोली : तालुक्यातील मोहझरी गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सदर रस्ते दुरूस्त करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मोहझरी गावातील मुख्य मार्ग डांबरीकरणाने बनला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
भंबारा चौकात अपघात वाढले
आलापल्ली : येथील सिरोंचा पुलाजवळ असलेल्या भंबारा चौकात भामरागड, चंद्रपूर, आलापल्ली व अहेरी हे चारही मुख्य मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक डीारणे आवश्यक आहे. मात्र, गतिरोधक नसल्याने सदर चौकात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.
विनाविमा वाहनांवर कारवाईच नाही
भामरागड : कोणतेही वाहन खरेदी केल्यानंतर त्या वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. वाहनाचा विमा असल्यास अपघातानंतर आर्थिक मदत मिळण्यास वाव असतो. मात्र. वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून वाहन खरेदी सुरू असल्याने रस्त्यावर लाखो वाहने विम्याशिवाय धावत आहेत.
सुरक्षाकवचाविना डीपी धोकादायक
देसाईगंज : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र विद्युत कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
डुकरांच्या बंदोबस्ताकडे पालिकेचे दुर्लक्ष
गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील सर्व २३ वॉर्डात डुकरांचा हैदोस प्रचंड वाढला आहे. मात्र, पालिकेच्या वतीने डुकरांच्या बंदोबस्ताकरिता काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आलेली मोहीम थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते. पालिका प्रशासनाचे डुकराच्या हैदोसाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.
निकतवाडा परिसरात कव्हरेजची समस्या
घोट : परिसरातील निकतवाडा परिसरात बीएसएनएल व अन्य खासगी कंपन्यांचे ग्राहक आहेत. या भागातील अनेक मोबाईलधारक इंटरनेटचा वापर करतात. परंतु, कव्हरेज विस्कळीत होत असल्याने ऑनलाईन कामे रखडत आहेत. सातत्याने मागणी करूनही सुधारणा करण्यात आली नाही.
शाळा आवारात जनावरांचा वावर
आलापल्ली : अहेरी पंचायत समितीअंतर्गत दुर्गम गावातील जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही पक्क्या स्वरूपाची संरक्षक भिंत उभारण्यात आली नाही. तसेच अनेक शाळांना प्रवेशद्वार उभारले नाही. परिणामी, गावातील मोकाट जनावरे शाळा परिसरात जाऊन हैदोस घालीत आहेत.
कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करा
आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हेमाडपंती शिव मंदिर जीर्णावस्थेत
गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिवमंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंती आहे. या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. तसेच मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते, असे सांगितले जाते. या मंदिरातून भूयार जात असून तो भूयार वैरागड येथील किल्ल्यामध्ये निघते, अशी आख्यायिका आहे.
येवली येथे जलद बसला थांबा द्या
गडचिरोली : येथून जवळच असलेल्या येवली येथे जलद बसला थांबा आहे. मात्र, गडचिरोली आगाराच्या बसगाड्याव्यतिरिक्त इतर आगारांच्या जलद बसगाड्या येथे थांबत नाहीत. त्यामुळे नागरिकांना गडचिरोली आगारात बसगाडी बदलावी लागत आहे.
झुडूपी जंगल शेतीसाठी उपलब्ध करा
गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडूपी जंगल आहे. सदर जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.
पोर्ला बसस्थानकावर गतिरोधकाची गरज
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथील बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने नेतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.
जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई
कमलापूर: शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंबकल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. खमनचेरू प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येते.
कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती केव्हा होणार ?
गडचिरोली : सिंचाई विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात नाल्यांवर शेकडो कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. मात्ऱ मागील अनेक वर्षांपासून या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही. अनेक बंधारे फुटले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी साचून राहत नसल्याने सभोवतालचे शेतकरी अडचणीत आले आहेत. नदी, नाले, तलाव, बोड्या असूनही बंधारे योग्य नसल्याने व्यवस्था अपुरी आहे.
युवक गुंतले सट्टापट्टीच्या व्यवसायात
गडचिरोली : लॉकडाऊननंतर अनेकांच्या हातांना काम नसल्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. त्यातून काही भागात सट्टापट्टी सुरू आहे. अनेक युवक एजंट म्हणून सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.
मद्यपी वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात
गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या
धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात अंधाराचे साम्राज्य पसरते.
माेहझरी फाट्यावर बसथांबा उभारा
वैरागड : वैरागड-देलनवाडी मार्गावरील माेहझरी फाट्यावर असलेल्या जुन्या बसथांब्याची पूर्णपणे पडझड झाली आहे. त्यामुळे येथे वाहनाची प्रतीक्षा करीत असलेल्या प्रवाशांना झाडाचा आधार घ्यावा लागताे. प्रशासनाने या ठिकाणी बसथांब्याचे बांधकाम करावे, आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी या भागातील प्रवाशांनी केली आहे. प्रवासी निवारा याेग्यरित्या नसल्याने त्याचा त्रास माेहझरी, सुकाळा येथील प्रवाशांना होत आहे. या भागातील बऱ्याच प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. वादळामुळे सिमेंट पत्र्याचे छत उडाले आहे. तसेच भिंती विदृूप झाल्या असून रंगरंगाेटीची मागणी होत आहे.