लोकांमध्ये कोरोना लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी शासनाने विविध प्रकारची तालुक्यात नियमित जनजागृती सुरू ठेवली आहे. लोकांच्या मनात कोरोना लसीकरणाविषयी अनेक गैरसमज झाले होते. ते दूर करण्यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात महसूल विभाग, पंचायत समिती, आरोग्य विभाग, नगरपंचायत, सामाजिक संस्थांनी लसीकरण शिबिराचे आयोजन करून लसीकरण करून घेण्यासाठी नागरिकांना तयार करीत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक आता लसीकरण करून घेण्याकडे वळले आहेत. कोरची तालुका आता कोरोनामुक्तीच्या वाटचालीकडे आहे.
कोरची तालुक्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत झालेल्या लसीकरणापैकी मागील पाच दिवसांत सर्वाधिक लसीकरण झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. पाच दिवसांच्या कालावधीत १ हजार ४५० जणांनी लस घेतली आहे. ग्रामीण भागातील बेळगाव, मोहंगाव, कोचीनारा, कोटगुल, सोनपूर, नांगपूर, बिहटेकला या गावांमध्ये कोविड-१९ ची लस सर्वाधिक लावण्यात आली आहे. मागील आठवडाभरापासून कोरची तालुक्यात एकही कोरोनाबाधित नसून सध्या बधितांचा आकडा निरंक झालेला आहे. या पाच दिवसांपैकी मंगळवारी ४५० नागरिकांना लस लावण्यात आली आहे. या दिवशी ग्रामपंचायत बेळगाव येथे ११० नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. यामध्ये १८ ते ९० वयोगटातील नागरिकांनी लस लावून घेतली. या लसीकरण शिबिराला कुरखेडा उपविभागीय अधिकारी समाधान शेडगे, तहसीलदार सी.आर. भंडारी, मेश्राम, बेडगावचे सरपंच चेतन किरसान, उपसरपंच देवीदास गुरुनुले, सचिव दुधे, पोलीस पाटील माधुरी गंधेवार व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.