सिरोंचा : भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत अद्याप आपले पत्ते खुले केले नसले तरी भाजपचे अहेरी येथील आमदार व नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव सत्यवानराव आत्राम यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रखरपणे मांडली व स्वतंत्र विदर्भ राज्य द्या, याबाबतचे निवेदनही राज्यपालांना सादर केले आहे. आमदार अम्ब्रीशराव महाराज यांनी सिरोंचा येथे दौऱ्यावर आलेल्या राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विदर्भाची मागणी लावून धरली. सोबतच अहेरी विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित समस्यांची यादीच त्यांच्यासमोर सादर केली आहे. या यादीमध्ये नागपूरला राजधानी घोषित करून विदर्भ वेगळा करण्यात यावा, अहेरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी, वांगेपल्ली-गुड्डम या तेलंगणाला जोडणाऱ्या पुलास त्वरित मान्यता देण्यात यावी, चव्हेला धरणामुळे गडचिरोली जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहे. त्याचबरोबर अनेक गावे उठवावी लागणार आहेत. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील जंगलही धोक्यात आले आहे. त्यामुळे सदर धरण रद्द करण्यात यावे, देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग करण्याची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे. मात्र राज्य शासनाने यासाठी निधी दिला नसल्याने सदर बांधकाम रखडले आहे. या रेल्वे मार्गाचे बांधकाम झाल्यास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासास फार मोठे हातभार लागेल. वनजमिनीवरील अतिक्रमनधारकांची तीन पिढ्यांची अट रद्द करण्यात यावी, देवलमरी, महागाव, गेर्रा, रेगुंठा, टेकडा, रंगयापल्ली या उपसा सिंचन योजनांचे बांधकाम रखडले आहे. सदर योजना कार्यान्वित करण्यात याव्या, सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा-चेन्नूर मार्गावरील प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)
भाजप आमदाराने राज्यपालांकडे मागितला स्वतंत्र विदर्भ
By admin | Published: November 08, 2014 10:38 PM