कौसर खान/ संजय गज्जलवार
सिरोंचा / जिमलगट्टा : तेलंगणातील अतिवृष्टीमुळे विसर्ग वाढल्याने गडचिरोलीत इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी नदीने रौद्ररुप धारण केले आहे. नदीकाठच्या गावांना पुरांनी वेढण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा प्रशासनाने रात्रभर मदतकार्य राबवून सुमारे ३३० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
तेलंगणातील कडेम धरण ओव्हरफ्लो झाले आहे. येलमपल्ली धरणाचे ६२ पैकी ४८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. येलमपल्लीतून २५ हजार ६९३ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. मेडीगड्डा धरणाचे सर्व ८५ दरवाजे उघडले आहेत. त्याद्वारे सुमारे ३७ हजार ८८१ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. मेडीगड्डाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. तालुक्यातील इंद्रावती, प्राणहिता व गोदावरी या नद्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पाण्याचा ओघ वाढला. सध्या दोन्ही प्रमुख नद्या तुडुंब भरुन वाहत आहेत. नगरम, जानमपल्ली, मुगापूर चक, चिंतमपल्ली, रामकृष्णपूर, मद्दीकुंठा या गावांत प्रशासनाने बचावकार्य राबवून रात्रीतून सुमारे ३३० नागरिकांनी सुरक्षितस्थळी हलविले आहे. या लोकांना सिरोंचातील आश्रमशाळेसह इतर शासकीय इमारतींत ठेवले आहे. तेथे निवासासह जेवण व आरोग्यसुविधा पुरविण्यात येत आहेत.
आज व उद्या शाळा बंद
दरम्यान, तालुक्यात पुराचा तडाखा बसल्याने २८ व २९ जुलै रोजी शाळा,महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुटी जाहीर केली आहे. तालुक्यात रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्हाधिकारी संजय मीणा, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे हे सर्व विभागांशी समन्वय ठेऊन पूरग्रस्तांना मदतकार्य करत आहेत.
अहेरी तालुक्यालाही पुराचा तडाखा
जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील जोगनगुडा, तिमरम, दुब्बागुडम या गावांत पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. घरातील धान्य, जीवनोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. पिके देखील पाण्याखाली गेली असून पशुधनासह स्वत:चा जीव वाचविण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु आहे. तलाठी सचिन मडावी यांनी पूरग्रस्तांना भेट देऊन धीर दिला. नुकसानीचे पंचनामे करुन भरपाईचा प्रस्ताव पाठविला जाईल,असे त्यांनी सांगितले.